शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 10:13 AM2024-07-07T10:13:35+5:302024-07-07T10:14:02+5:30

पालघरमध्ये बालविवाहाची समस्या गंभीर; मातामृत्यूचा वाढता धोका

Child marriage problem serious in Palghar 2462 pregnant under 19 years | शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

पालघर : जिल्ह्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे.  समाजातील छुप्या घटकांच्या पाठिंब्यानेच हे विवाह होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात १९ वर्षांखालील २,४६२ मुली गर्भवती असल्याच्या आकडेवारीतून बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिकण्याच्या वयातच या मुली बोहल्यावर चढत असल्यामुळे भविष्यात बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषणाची गंभीर बाब डोके वर काढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यातील आदिवासीबहुल भागात अल्पवयीन मुलींचा साखरपुडा (मागणा) केला जातो. साखरपुड्यानंतर ती मुलगी होणाऱ्या नवऱ्याच्या घरी नियमितपणे जाते. यातूनच शरीरसंबंध निर्माण होत असल्याने अल्पवयीन मुली गर्भवती राहत आहेत. अशा १९ वर्षांखालील मुलींची संख्या ही २,४६२ इतकी आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याची माहिती एका लोकप्रतिनिधीने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

७४३ महिला डहाणू तालुक्यातील

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी हे पाच तालुके दुर्गम आहेत. या तालुक्यांत माता, नवजात बालके यांचे मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडतात. कमी वयातील प्रसूती हे त्यामागील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांतील ३६ हजार १६८ गर्भवती महिलांपैकी २ हजार ४६२ गर्भवती या १९ वर्षांखालील आहेत. यात सर्वाधिक ७४३ महिला या एकट्या डहाणू तालुक्यातील आहेत. 

कायद्याची भीतीच उरली नाही

लग्न लावणारे भटजी, लग्नपत्रिका छापणारे, स्वयंपाकी आदींना पोलिस कायद्याची भीतीच उरली नसल्याने मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. त्यामुळे त्यांना पोलिसांनी लेखी पत्र पाठवून कायद्याची समज द्यायला हवी. लोकप्रतिनिधींकडून ग्रामपंचायतींना भेटी देताना बालविवाह रोखण्याबाबत प्रचार, प्रसार केला जातो; मात्र हे रोखण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

कोणत्या तालुक्यात किती गर्भवती मुली?

७४३ डहाणू 
३६३ जव्हार 
३०९ तलासरी 
३०४ पालघर 
२८४ विक्रमगड 
२२६ वाडा 
२०२ मोखाडा 
३१ वसई 
 

Web Title: Child marriage problem serious in Palghar 2462 pregnant under 19 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.