बालक परस्पर दत्तक देण्याचा कट उघडकीस
By admin | Published: March 20, 2016 02:32 AM2016-03-20T02:32:56+5:302016-03-20T02:32:56+5:30
नवजात बालकाला परस्पर दत्तक देण्याचा प्रकार उल्हासनगरात उघड झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगरातील कीर्ती रुग्णालयाचा डॉक्टर राजकुमार जाधव
ठाणे / उल्हासनगर : नवजात बालकाला परस्पर दत्तक देण्याचा प्रकार उल्हासनगरात उघड झाला आहे. या प्रकरणी उल्हासनगरातील कीर्ती रुग्णालयाचा डॉक्टर राजकुमार जाधव याला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तसेच बाळासह त्याच्या आईला उपचारार्थ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं.-४, कीर्ती हॉस्पिटलमधील डॉ. जाधव हा जन्मलेले सुमारे १२ दिवसांचे बाळ परस्पर दत्तक देणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा बालसंरक्षण कक्ष अधिकारी परमेश्वर रामचंद्र धसाडे यांना मिळाली होती.
त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने त्या रुग्णालयात बालक दत्तक मिळावे, यासाठी डमी ग्राहक पाठवले. त्यांना एक बाळ दत्तक देण्याची तयारीही डॉ. जाधव याने दर्शवली.
या वेळी केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियेचे पालन न करता बाळ परस्पर दत्तक देण्याचे काम डॉक्टरने केल्याप्रकरणी त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मात्र, बालकाची आई अविवाहित असून, त्याच्या वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी असे प्रकार येथे घडले का, याचाही शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
शहरात लहान मुलांच्या विक्रीचा गोरखधंदा सुरूच
शहरातील शासकीय बालगृहात परस्पर बालकाला लाखो रुपयांना विकून दत्तक देण्याचा प्रकार ४ वर्षांपूर्वी उघड झाला होता. सुभाष टेकडी परिसर व कॅम्प नं.-३मधील एका रुग्णालयातही अशी प्रकरणे पोलिसांनी उघडकीस आणून डॉक्टरसह काही महिलांना अटक केली होती.
शहरात लहान मुलांच्या विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे का, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करणार असल्याचे संकेत गुन्हे विभागाचे उपायुक्त पराग मणेरे यांनी दिले आहेत.