दिल्लीतून पळालेलेली मुले पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:30 PM2018-09-02T21:30:18+5:302018-09-02T21:37:42+5:30
दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी आणि अंश भूपेंद्र कुमार ही दोन्ही मुले वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. मुलांची माहिती मिळताच विमानाने दिल्ली ते मुंबई प्रवास करुन या पालकांनी मुलांना ताब्यात घेतले.
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दिल्लीतून पळालेली लक्ष हरिश्चंद्र पुरी (१४) आणि अंश भूपेंद्र कुमार (१३) हे दोघेही वागळे इस्टेट पोलिसांच्या चौकशीमुळे पालकांना सुखरूप परत मिळाली. आपली मुले ठाण्यात असल्याचे समजल्यानंतर पालकांनी दिल्ली पोलिसांसमवेत ठाण्यात विमानाने येऊन आपल्या मुलांना कवेत घेतले.
दिल्लीच्या मोदीबाग परिसरात राहणारी ही दोन्ही मुले क्षुल्लक कारणावरून राग आल्याने २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिल्लीतून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. २९ आॅगस्टला बांद्रा येथे उतरल्यानंतर त्यांनी पायीच ठाणे गाठले. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनसमोरील एका रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना एका नागरिकाने हटकले. त्यांची उलटसुलट उत्तरे ऐकून त्याने दोन्ही मुलांना वागळे इस्टेट पोलिसांकडे सोपवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या पथकाने चौकशी करून त्यांची माहिती काढली असता, ते दिल्ली येथून पळून आल्याचे समजले. दोघांपैकी एकाच्या आईने कुठे चोरी केली आहेस का, आता तुझे वडील रागावतील, इतकेच सुनावल्यानंतर त्या दोघांनी पळून जाण्याचा निश्चय केला. तिकडे दिल्ली येथील एका पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार २८ आॅगस्ट रोजी दाखल झाली होती. गव्हर्नमेंट बॉइज सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये नववीत शिकणा-या या मुलांचा शोध दिल्लीचे पोलीस उपनिरीक्षक अनुराग त्यागी यांचे पथक घेत होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यागी यांचे एक पथक मुलांच्या पालकांना घेऊन १ सप्टेंबर रोजी विमानानेच मुंबईत आले. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपेंद्र प्रसाद आणि हरिश्चंद्र पुरी या दोन्ही मुलांना शनिवारी रात्री आपल्या कवेत घेतले. त्यावेळी दोघांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही. दोघांकडेही फोन नव्हते. अशाही अवस्थेत ठाणे पोलिसांमुळे मुले सुखरूप मिळाल्याने दोघांच्याही पालकांनी समाधान व्यक्त केले.