फटाक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा, चिमुकल्यांनी दिला ठाणेकरांना संदेश
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 11, 2023 11:22 AM2023-11-11T11:22:59+5:302023-11-11T11:23:25+5:30
ठाणे: नाही वाजवणार फटाके !आम्ही वाचणार पुस्तके !! असे म्हणत जिज्ञासा ट्रस्टची अनोखी दिवाळी प्रभात फेरी ठाण्यात काढण्यात आली. ...
ठाणे: नाही वाजवणार फटाके !आम्ही वाचणार पुस्तके !! असे म्हणत जिज्ञासा ट्रस्टची अनोखी दिवाळी प्रभात फेरी ठाण्यात काढण्यात आली. फटक्यांपेक्षा पुस्तक वाचनाचा आनंद मोठा असा संदेश चिमुकल्यांनी ठाणेकरांना दिला आणि फटाके न वाजवण्याची शपथ त्यांनी घेतली.
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था गेली पंचवीस वर्षे ' प्रदूषण मुक्त दिवाळी ' हा जागरूकता उपक्रम आयोजित करीत असते. या वर्षी त्याला मराठी भाषा जोपासणे आणि मराठी शाळा सक्षमीकरणाची जोड दिली गेली आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट पुरस्कृत, मराठी शाळा सक्षमीकरण अभियान अंतर्गत सहभागी होणारी सरस्वती पूर्व प्रार्थमिक विभाग,नौपाडा, गावदेवी शिक्षण मंडळ पाचपाखाडी, कर्मवीर भाऊराव पाटील, संकल्प सामाजिक संस्था, बुडोकोन स्पोर्ट्स असोसिएशन आदींचे विद्यार्थी या प्रभात फेरीत सहभागी झाले होते.
सुरुवातीला प्रार्थना आणि गीते झाली त्यानंतर थिएटर कोलाजतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचे विनोदी अंगाने सादरीकरण करण्यात आले. प्रभात फेरी शाळा क्रमांक 95 मध्ये समाप्त झाली यावेळी व्यास क्रिएशनच्या वतीने देण्यात आलेली पुस्तके जिज्ञासा ट्रस्ट विश्वस्त सुरेंद्र दिघे आणि सुनीता दिघे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाटप केली यावेळी शिक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.