मुले परदेशात असल्याने स्नेहींनी केले वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:31 AM2021-05-03T00:31:38+5:302021-05-03T00:32:14+5:30
कोरोनामुळे झाला होता मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : तिचे वय वर्षे ७०. तिला कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, कारण तिची तिन्ही मुले परदेशात आणि पती कोरानाग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध असलेल्या दोन भावांनी जिवाची पर्वा न करता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य बजावले.
कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात राहणाऱ्या उषाबेन पटेल यांना कोरोनाची लागण झाली. ७० वर्षांच्या उषाबेन यांना कल्याणच्या खाजगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे पती रमणभाई हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले. कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उषाबेन यांचा उपचारादरम्यान १२ दिवसांनी १४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार कोण, असा प्रश्न होता. कारण त्यांची एक मुलगी वंदना आफ्रिकेत, तर एक मुलगा अमित आणि मुलगी अस्मिता हे दोघे लंडनमध्ये होते. कोरोना झालेले रमणभाई घराबाहेर कसे पडणार? त्यातही त्यांचे वय ७३ वर्षे. अशा परिस्थितीत उषाबेन यांच्या कुटुंबाशी गेल्या तीन पिढ्या ऋणानुबंध असलेले कल्याणमधील विनोद पटेल आणि योगेश पटेल यांच्याशी त्यांच्या तिन्ही मुलांनी परदेशातून संपर्क साधला. विनोद व योगेश या पटेल बंधूंना उषाबेनवर अंत्यसंस्कार तुम्हीच करा, आम्ही इतक्या कमी वेळेत तातडीने येऊ शकत नाही. फोन येताच पहाटे दोन वाजता उषाबेन यांचा मृतदेह घेण्यासाठी विनोद व योगेश पोहोचले. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात माजी नगरसेवक अरुण गीध यांनी प्रयत्न केला. त्यानंतर सकाळी उषाबेन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर लाल चौकी येथील स्शमानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषाबेन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावरील अंत्यसंस्काराला मुले नव्हती. पती रमणभाई यांनाही पत्नीवर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. उषाबेन गेल्यावर आता रमणबाई कोरोनातून बरे झाले आहे. त्यांची लंडन येथे वास्तव्याला असलेली मुलगी अस्मिता कल्याणच्या घरी परतली आहे. आता ती रमणभाई यांची काळजी घेत आहे.