मुलामुलींची नोंद ‘गुड्डागुड्डी’च्या रकान्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:47 PM2019-03-04T23:47:27+5:302019-03-04T23:47:35+5:30
गावातील मुलींचा जन्मदर त्वरित लक्षात यावा आणि त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे : गावातील मुलींचा जन्मदर त्वरित लक्षात यावा आणि त्यात वाढ करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यास अनुसरून आता संबंधित गावात जन्मलेल्या बालकांची नोंद त्याच दिवशी अंगणवाडी केंद्रातील फलकावर केली जाणार आहे. यासाठी गुड्डा (मुलगा) - गुड्डी (मुलगी) असे दोन रकाने असलेल्या फलकांचे जिल्ह्यातील सुमारे २५० अंगणवाडी केंद्रांत वाटपही केले आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात ‘गुड्डा-गुड्डी’ असे दोन भाग असलेले फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नव्या संकल्पनेनुसार संबंधित गावपाड्यांतील मुलींच्या जन्मदराची माहिती त्वरित मिळणे शक्य होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २५० अंगणवाड्यांमध्ये ‘गुड्डा-गुड्डी’असलेले फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गावात मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच या फलकाच्या संबंधित रकान्यात त्यांची नोंद अंगणवाडीसेविकेद्वारे त्याच दिवशी घेतली जाणार आहे. जन्मलेल्या नवजात बालकांची दररोज आकडेवारी या ‘गुड्डा-गुड्डी’ फलकावर नोंदवण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे.
संबंधित गावाच्या प्राथमिक माहितीसह नवजात बालकांची नोंद घेऊन गावातील बालकांच्या आकडेवारीचा अहवाल अद्ययावत ठेवला जाणार आहे. यासाठी एक हजार १५४ अंगणवाड्यांना फलक दिले जातील. त्यापैकी सुमारे २५० अंगणवाड्यांना ते दिले आहेत. आता प्रत्येक अंगणवाडीच्या प्रथमदर्शनी भागात रोजची नोंद घेतलेला हा फलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नवजात बालकांचा दर तसेच त्यातील मुलींचे प्रमाण एका नजरेत लक्षात येईल. रोजची नोंद असलेले फलक अंगणवाड्यांकडून मागवल्यास अवघ्या काही मिनिटांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जन्मदराचा आकडेवारीचा अहवाल सहज मिळवता येणार असल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.
>अंगणवाडी केंद्राला भेट देणारे पाहुणे, अभ्यासक तसेच शासकीय यंत्रणा आदींना या फलकाद्वारे मुलींच्या जन्मदराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. संबंधित गावातील मुलींच्या जन्मदरासाठी आता मोजणी किंवा त्यांच्या सर्वेक्षणाची गरज नाही.