मुलांचे आर.टी.ई. शालेय प्रवेश 15 सप्टेंबरपर्यंत करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 06:07 PM2020-09-04T18:07:03+5:302020-09-04T18:08:18+5:30
लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये.
ठाणे : आर.टी.ई. शालेय प्रवेश प्रक्रियेसठी ज्या बालकांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली आहे, त्या बालकांचे शालेय प्रवेश 15 सप्टेंबरपर्यंत पालकांनी शाळेत जाऊन निश्चित करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेजद्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची 'तारीख' या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊनमुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्स अप किंवा ईमेल, अन्य माध्यमे आदींद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा तात्पुर्ता प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे.
वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8 वीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी इ.1 लीच्या मंजूर जागांच्या 25 टक्के प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम प्रवेशस्तरावर करावयाचे आहेत. ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आर.टी.ई. चे 25 टक्के प्रवेशासाठी 31 मार्च रोजी लॉटरीद्वारा निवड प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. त्यात न ऊ हजार 326 बालकांची निवड झाली आहे. शाळांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ही बडे यांनी स्पष्ट केले आहे.
* पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
1) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि छायांकित प्रती.
2) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लीक करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.