आजीबाईंचा बटवा पुन्हा पुनर्जिवीत करणारा स्तुत्य प्रकल्प, बालक मंदिर शाळेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 05:19 PM2017-09-14T17:19:42+5:302017-09-14T17:19:42+5:30
सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजीबाईच्या बटव्यातील गोष्टी लुप्त झाल्या आहेत. आजीबाईचा बटवा पुनर्जिवीत करण्यासाठी बालक मंदिर संस्था, कल्याण येथे गोष्टीतून संस्कार आणि शिक्षण या प्रकल्पाचे आयोजन केले होते.
कल्याण, दि. 14 - सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजीबाईच्या बटव्यातील गोष्टी लुप्त झाल्या आहेत. आजीबाईचा बटवा पुनर्जिवीत करण्यासाठी बालक मंदिर संस्था, कल्याण येथे गोष्टीतून संस्कार आणि शिक्षण या प्रकल्पाचे आयोजन केले होते. मुलांना गोष्टी ऐकायला आणि पाहायला खूप आवडतात. मुलांमध्ये शब्दसंग्रह वाढणे, निर्णयक्षमता, संघटन, प्रसंगावधान अशा अनेक गोष्टी मनात आपोआप रुजविण्याचे काम या प्रकल्पातून केले जात आहे.
बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे वार्षिक प्रकल्पांतर्गत शाळेच्या सभागृहात जातककथा, इसापनिती, हितोपदेश अशा प्राचीन बालसाहित्यातून मिळविलेल्या आणि मुलांना आवडतील अशा निवडक गोष्टी चित्रसहित लावल्या होत्या. या प्रकल्पाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या स्थापनेपासून वेगवेगळे विषय घेऊन अश्याप्रकारचा प्रकल्प मांडला जातो. त्यामुळे 40 हून अधिक वर्षापासून या शाळेत असा प्रकल्प मांडला जात आहे. या प्रकल्पात आतापर्यंत धातूचा उपयोग, बारा बलुतेदार, घरांचे विविध प्रकार, श्रवणातील सण असे वेगवेगळे विषय हाताळले जातात. हे दोन दिवसीय प्रदर्शन सकाळी 9 ते 1.30 या वेळेत कल्याणमधील सर्व शाळांना पाहण्यासाठी खुले आहे. मुलांना सांगण्यापेक्षा डोळ्य़ांनी बाघितलेले चांगले शिक्षण लक्षात राहते म्हणून ठराविक गोष्टी चित्र स्वरूपात दाखवून मुलांमध्ये नकळतपणे चांगला बदल घडावा आणि चांगले संस्कार मनात हळूवारपणे रूजविले जावेत या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सध्या मुलांना फारश्या गोष्टी ऐकविल्या जात नाही याकरिता यंदा गोष्टीतून संस्कार आणि शिक्षण हा विषय घेतल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा भिडे यांनी सांगितले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष अनंत काळे, पूर्व प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष मंजुषा ढवळे,कार्यवाहक प्रसाद मराठे, डॉ. व. द. काणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात तहानलेला कावळा, ससा आणि कासव, चल रे भोपळ्य़ा टुणूक टुणूक, सिंह आणि पिटुकला उंदीर, टोपीवाले व माकडे, प्रामाणिक लाकूडतोडय़ा, पिपाणीवाला आणि गावकरी (पुंगीवाला), लबाड कोल्हा, कोल्हा आणि करकोचा, सिम्मी मासा या गोष्टी चित्र स्वरूपात मांडल्या आहेत. या गोष्टीतून मुलांना जशास तसे, एकत्र या संकटावर मात करा, स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, छोटय़ा माणसांच्या ताकदीला कमी लेखू नका, इच्छा तिथे मार्ग असे निष्कर्ष निघणा-या गोष्टी दाखविल्या आहेत. या सर्व गोष्टीचा सार सामावलेली एक कविता शाळेच्या सहशिक्षिका अनुजा पेठे यांनी केली आहे. ती ही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
उदय सामंत म्हणाले, मुलांना शिक्षणासोबत संस्कार दिले पाहिजेत. संस्कार म्हणजे काय हे मुलांना समजत नाही. तसे संस्कार करतो असे म्हणून ते होत नाही. संस्कार हे आपोआप होत असतात. मुले पालकांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे पालक जसे वागतात तशीच मुले घडत जातात. मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेऊ द्या, त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालकांनी मुलांना मदत आणि मार्गदर्शन करावे. त्यातूनच मुलांनाच सर्वांगीण विकास होईल. हाताची सर्व बोटे सारखी नसतात. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यात वेगवेगळे कलागुण आहेत. ते कलागुण ओळखा, असा सल्लाही त्यांनी दिला.