हलगर्जीपणामुळे गर्भातच बाळाचा मृत्यू; रक्मिणीबाई रुग्णालयाच्या महिलेला ठेवले ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:47 AM2017-10-15T00:47:21+5:302017-10-15T00:47:29+5:30
प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर तातडीने उपचार करण्याऐवजी तिला डॉक्टर नसल्याचे कारण देत ताटकळत ठेवण्यात आले. पाच तासांनंतर महिला प्रसूत झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ दगावले.
कल्याण : प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर तातडीने उपचार करण्याऐवजी तिला डॉक्टर नसल्याचे कारण देत ताटकळत ठेवण्यात आले. पाच तासांनंतर महिला प्रसूत झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ दगावले. ही घटना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घडली आहे. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीप्रकरणी तक्रार देण्यासाठी तिच्या पतीने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस तक्रार घेत नसल्याचे पतीने सांगितले.
वर्षा ढगे (रा. टिटवाळा) या रक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. रुची उपाध्याय यांच्याकडे चार महिन्यांपासून उपचार घेत होत्या. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वर्षा यांना प्रसूतिवेदना सुरू झाल्या. त्यामुळे पती रवी यांंनी त्यांना उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात ५.४५ वाजता दाखल केले. मात्र, वर्षा यांच्या पायात पाणी झाल्याने, त्यांच्या प्रसूतीसाठी रुग्णालयातील कर्मचाºयांनी नकार दिला. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वर्षा यांना रक्तस्राव होत असतानाही कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगूनही दाद देत नव्हते. दुपारी १२.३० पर्यंत त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. बाळाचे डोके वर्षा यांच्या मांडीला लागत असल्याचे सांगितले असता, कर्मचाºयांनीच ‘तुम्हाला जास्त कळते की आम्हाला’, असे सांगून वर्षा यांना गप्प केले.
दुपारी एक वाजून ८ मिनिटांनी बाळाचा जन्म झाला, परंतु ते मृत जन्माला आल्याचे सांगण्यात आले. बाळाचा मृत्यू १२ वाजून ३० मिनिटांनी झाल्याचे सांगितले. मात्र, त्याची नोंद १ वाजून ८ मिनिटे, अशी केली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे बाळाचा जीव गेला आहे. वर्षा यांना आधी दोन मुली आहेत. आता मुलगा झाला होता. या प्रकरणी रवी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.
या संदर्भात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील म्हणाल्या, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. ढगे यांच्या वेळी एक डॉक्टर होते. मात्र, अन्य ओपीडीत व्यस्त होते. घडल्याप्रकरणी चौकशी करून कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.