आईच्या निवाऱ्याकरिता मुलाची विनंती
By admin | Published: March 27, 2017 05:53 AM2017-03-27T05:53:18+5:302017-03-27T05:53:57+5:30
तालुक्यातील नढई येथील योगेश दगडू मुकणे हा नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याची आई मंजूळाबाई बेघर
प्रकाश जाधव / मुरबाड
तालुक्यातील नढई येथील योगेश दगडू मुकणे हा नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याची आई मंजूळाबाई बेघर झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी मुकणे कुटुंबाला इंदिरा आवास योजनेत घर मंजूर झाले होते. मात्र, त्याच वेळी योगेश गंभीर गुन्ह्यात अडकल्याने ते रद्द झाले. मात्र, आता आपल्या आईला पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर करावे, अशी मागणी योगेशने शासनाकडे केली असून मुरबाड पंचायत समितीने योगेशच्या मातृप्रेमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक कारागृह अधीक्षकांमार्फत शासनाला लिहिलेल्या पत्रात योगेशने आपल्या चुकीमुळे आई व भाऊ बेघर झाल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला असून आपल्या कृत्याची शिक्षा तिला न देता पंतप्रधान आवास योजनेतून आईला घर देण्याची विनंती शासनाला केली. आईला २०१२-१३ या आर्थिक वर्षात इंदिरा आवास योजनेत घर मंजूर झाले. मात्र, मी गुन्ह्यात अडकल्याने ते रद्द झाले. मला जन्मठेप झाल्यानंतर घर बांधू कुणाकरिता, अशी आईची केविलवाणी अवस्था झाली. आमच्या जुन्या झोपडीत ती कष्टप्रद जीवन जगत होती. देखभालीअभावी त्या झोपडीची वाताहत झाल्याने कालांतराने ती झोपडी सोडून मंजूळाबाई वणवण भटकत असल्याचे समजते. योगेशचे हे पत्र मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी यांच्याकडे पोहोचले. आपल्या बेघर आईला निवारा मिळावा, याकरिता तुरुंगात असलेल्या पुत्राची तळमळ पाहून मंजूळाबार्इंना पंतप्रधान आवास योजनेत घर देण्याच्या हालचाली करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. पुत्रविरहाने घर सोडून गेलेल्या या माऊलीचा सध्या शोध घेण्यात येत असून मुकणे कुटुंबाच्या नातलगांकडे जाऊन मंजूळाबार्इंची चौकशी केली जात आहे.
योगेश मुकणे हा जरी अपराधी असला आणि तो नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असला, तरी त्याच्या आईला घर देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नव्याने शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. मंजूळाबाई यांना यापूर्वी इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. मात्र, आता योगेशच्या विनंतीवरून आईला घर दिले जाईल.
-एस.ई.ए. हश्मी, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, मुरबाड