चिमुरड्यांच्या दागिन्यांची मागणी दुप्पट

By admin | Published: January 12, 2016 12:46 AM2016-01-12T00:46:24+5:302016-01-12T00:46:24+5:30

गोडगोजिऱ्या चिमुकल्यांसाठीच्या नक्षीदार काळ्या कापडावरील किंवा चमचमणाऱ्या काळ्या कागदावरील सुबक हलव्याच्या दागिन्यांची मागणी यंदा दुप्पट झाली आहे.

Chimudra jewelery demand doubles | चिमुरड्यांच्या दागिन्यांची मागणी दुप्पट

चिमुरड्यांच्या दागिन्यांची मागणी दुप्पट

Next

ठाणे : गोडगोजिऱ्या चिमुकल्यांसाठीच्या नक्षीदार काळ्या कापडावरील किंवा चमचमणाऱ्या काळ्या कागदावरील सुबक हलव्याच्या दागिन्यांची मागणी यंदा दुप्पट झाली आहे. लहान मुले असोत की नववधू किंवा जावई, संक्रांतीच्या पहिल्या सणाला हलव्याचे दागिने घालून नटण्याची, छान फोटोसेशन करण्याची परंपरा अजूनही कायम असल्याचे यानिमित्ताने दिसून येते. त्याचबरोबर, आजवर महाराष्ट्राची मानली गेलेली परंपरा आता भाषेच्या सीमा ओलांडून अमराठी मुलुखही पादाक्रांत करते आहे.
लहान मुलांचे बोरन्हाण असो की, संक्रांतीनिमित्त खास काळी वस्त्रे घालून काढलेले फोटो असोत, त्यानिमित्तापुरते का होईना हलव्याचे दागिने घालण्याची गंमत आजही संक्रांतीत पाहायला मिळते. फोटो काढेपर्यंत मुलांनी दागिन्यांनी सजलेले हात सहज तोंडात घालून त्यांची चाखलेली ‘चव’ किंवा हाताने ते ओढून काढत त्याचे केलेले ‘खेळणे’ आणि मोठ्यांची त्यानिमित्ताने झालेली लगबग, हे ‘सोहळे’ आजही पाहायला मिळतात. खऱ्या दागिन्यांइतकीच नजाकत, कलाकुसर असलेल्या हलव्याच्या दागिन्यांची संक्रांतीनिमित्तची मागणी यंदा दुपटीने वाढली आहे. यातील लहान मुलांच्या दागिन्यांचे प्रमाण ७० टक्के, महिलांच्या दागिन्यांचे प्रमाण ३० टक्के आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हलव्याच्या दागिन्यांना मागणी असते. लहान मुलामुलींसाठी राधाकृष्ण सेट, महिलांसाठी नववधूच्या शृंगाराचा सेट आणि पुरुषांसाठी सेट, असे हे दागिने तयार केले जातात. मुलांसाठीचा राधाकृष्णाचा सेट ११० पासून १५० रुपयांपर्यंत, तर महिलांच्या सेटची किंमत ५५१ पासून अगदी १००० ते १२०० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

महिलांसाठी सेट : मुकुट, कमरपट्टा, बाजूबंद, चिंचपेटी, बांगड्या, मंगळसूत्र, कानातले डूल आणि वेल, नथ, अंगठी, बिंदी, शाही हार, नेकलेस पाचल्या, छल्ला, मेखला

लहान मुलींसाठी असलेला राधा सेट : मुकुट, बाजूबंद, हातातले गजरे, हार, अंगठी, कानातले डूल, फुल

लहान मुलांसाठी असलेला कृष्ण सेट : मुकुट, बाजूबंद, हातातले गजरे, हार, अंगठी, बासरी

अमराठी कुटुंबांतूनही मागणी : हलव्याच्या दागिन्यांची क्रेझ सर्वांमध्येच वाढत आहे. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी महिलादेखील खरेदी करतात. गुजराती आणि दक्षिण भारतीय महिलांनीही मागणी नोंदवली आहे. लहान मुलांचे फोटो काढण्यासाठी किंवा प्रसंगी शाळेत घालून जाण्यासाठी या सेटची मागणी अधिक आहे. हलव्याच्या दागिन्यांची क्रेझ वाढत असल्याने यंदा मागणी दुप्पट झाली आहे. - स्वाती पाटील

Web Title: Chimudra jewelery demand doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.