ठाण्यात झाड पडून चिमुरडी जखमी, प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:25 AM2017-12-11T06:25:24+5:302017-12-11T06:25:35+5:30
सावरकरनगर येथील एका घरावर धोकादायक नारळाचे झाड पडून रविवारी सकाळी दिव्यांशी यादव ही पाचवर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सावरकरनगर येथील एका घरावर धोकादायक नारळाचे झाड पडून रविवारी सकाळी दिव्यांशी यादव ही पाचवर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली. झाडाचा काही भाग चिमुरडीच्या पोटावर आदळल्याने तिला अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे तातडीने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील सावरकरनगर येथील अष्टविनायक सोसायटी येथील रूम नंबर ६ मध्ये राहणारे शिवलाल यादव यांच्या घरावर रविवारी सकाळी अचानक नारळाचे झाडे कोसळले. हे झाड पडले तेव्हा त्यांची मुले घरात झोपली होती. याच दरम्यान, पडलेल्या झाडाचा काही भाग चिमुरडी दिव्यांशीच्या पोटावर पडला. तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान तिला अंतर्गत रक्तस्राव होत असल्याची बाब पुढे आली. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने मुंबईला हलवले. तिथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती कक्षाच्या सूत्रांनी दिली.
सावरकरनगर येथे पडलेले नारळाचे झाड, हे धोकादायक झाले होते. असे तेथील स्थानिकांनी सांगितले. त्याबाबत, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.