उल्हासनगरातील चिक्कीची एफडीएकडून होणार तपासणी
By admin | Published: July 13, 2015 03:19 AM2015-07-13T03:19:00+5:302015-07-13T03:19:00+5:30
महापालिका शाळेच्या मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका शाळेच्या मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून मुलांच्या पटसंख्येनुसार लेखाजोखा घेऊन दरमहा चिक्कीचे बिल काढण्याचा आदेशही काढला आहे. आयुक्तांच्या आदेशाने ठेकेदाराचे धाबे दणाणले असून चिक्की घोटाळा बाहेर येणार आहे.
उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळ नोकर भरतीसह शिक्षक जिल्हानिहाय बदली तसेच साहित्य खरेदी प्रकरणात वादात सापडली आहे. या प्रकाराने मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. मंडळ वादात सापडल्याने कोणताही अधिकारी येथे येण्यास धजावत नसून गेल्या दोन वर्षांपासून मंडळाचा कारभार कनिष्ठ कर्मचारी व प्रभारी प्रशासन अधिकारी हाकत असल्याने सावळागोंधळ निर्माण झाला आहे.
महापाालिकेच्या बहुतेक शाळा इमारती धोकादायक झाल्या असून या वर्षी ६ कोटींच्या निधीतून तीन शाळेच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. मात्र, निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने शाळा इमारतीचा प्रश्न कायम आहे. ७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी धोकादायक इमारतीखाली जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा इमारती बांधण्याऐवजी शिक्षण मंडळ गेल्या दोन वर्षांपासून शासनाचा पोषण आहार असताना २ कोटींची चिक्की देत आहे. एकंदरीत पालिका शिक्षण मंडळ घोटाळ्यात सापडले असून तीन वर्षांपूर्वी १८ लाखांचा खर्च सहलीवर दाखविण्यात आला होता. प्रत्यक्षात मुलांची सहल शेजारी रिसॉर्टमध्ये गेली होती. ती चौकशीही धूळखात पडली आहे. शासनाचा शालेय पोषण आहार मुलांना दिला जात असताना २ कोटींची चिक्की देणे कितपत योग्य? हे
चोचले कशासाठी, अशी टीकाही होत आहे.