ठाण्यात आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत चिन्मय चौहान अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 07:43 PM2018-02-11T19:43:11+5:302018-02-11T19:50:57+5:30
ठाणे : मुकंद स्पोर्ट्स आयोजित क्रीडा महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली असून, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील मुलांच्या गटात चिन्मय चौहान तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी यांनी अव्वल स्थान पटकावत, आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर नाव कोरले आहे.
हिरानंदानी विद्यालयाच्या चिन्मय चौहानने अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या सुमित खिल्लारीला मागे टाकत मुकंद लिमिटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लब आयोजित ३.५ किलोमीटर अंतराच्या आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. चिन्मयने १२ मिनिट १९ सेकंदात हे अंतर पार केले. सुमितने त्याच्यापाठोपाठ १२ मिनिट २० सेकंद घेऊन दुसरे स्थान मिळवले. स्वामी विवेकानंद हायस्कूलचा अंकीत चौहानने १२ मिनिट ३० सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. अंकितपाठोपाठ स्वामी विवेकानंद हायस्कूलचे अनिश सियाराम आणि दीपक प्रजापती अनुक्र मे चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले.
मुलींमध्ये आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या परिणा खिल्लारी हिने समाधानकारक अंतर राखत पहिले स्थान पटकावले. परिणाने ३.५ किलोमीटरचे अंतर १३ मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केले. हेच अंतर पार करण्यासाठी दुसºया स्थानी राहिलेल्या होलीक्र ॉस कॉन्व्हेंटच्या इशिका इंगळेला १४ मिनिटे २ सेकंद एवढा वेळ लागला. मुलांच्या शर्यतीप्रमाणे मुलींमध्येही तीन ते पाचव्या क्र मांकापर्यंत एकाच शाळेच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली. राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या श्रावणी गुजर (१४ मिनिट ६ सेकंद), सिद्धी वंजारे (१४ मिनिटे १० सेकंद ) आणि रिद्धी शेंडे (१४ मिनिट १२ सेकंद ) अनुक्र मे तिसºया, चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत वीस शाळांमधील सुमारे १४०० धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना एमआयडीसी रबाळे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर, मुकंद स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष पी. सतीश, सहउपाध्यक्ष अरु ण पिसे, सचिव राजेश पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.