चितळे यांचे दुकान यापुढे दिवसभर उघडे राहणार
By admin | Published: May 16, 2017 12:11 AM2017-05-16T00:11:25+5:302017-05-16T00:11:25+5:30
माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते. दुकानातील कामगार दुधाची, पेपरची लाइन टाकून कामावर यायचे. त्या कामगारांना विश्रांती मिळावी आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढावी, म्हणून चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ बंद असते, असे उत्तर चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे यांनी रविवारी दिले. डेक्कन येथे सुरू झालेले दुकान लवकरच १२ तास सुरू राहील तर ठाणे, मुंबईत शाखा सुरू झाल्यावर या ठिकाणीही चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ या वेळेत बंद न राहता १२ तास सुरू राहील, असेही त्यांनी जाहीर केले.
‘इंद्रधनू’च्या वतीने रविवारी सरस्वती क्रीडा संकुल सभागृहात विश्वास, अंजली आणि इंद्रनील चितळेंशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले. ‘चितळ्यांच्या गायी-म्हशी खरंच तिप्पट दूध देतात का’, ‘चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद का असते’, ‘चितळ्यांच्या बाकरवडीच्या खुसखुशीतपणाचं रहस्य काय?...’ अशा एक ना अनेक खुसखुशीत प्रश्नांचा भडीमार केला. काही प्रश्नांनी व त्यावरील उत्तरांनी उपस्थितांना पोट धरून हसवले. चितळे हे ठाणेकर आणि पुणेकर खवय्यांमुळे उभे आहेत. आजोबांनी भिलवडीमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा दूध विकायला मुंबईत आले, परंतु काही अडचणींमुळे हा व्यवसाय पुण्यात सुरू केला. भिलवडीमध्ये उत्पादन आणि पुण्यात विक्री असा आमचा उद्योग १९३९ मध्ये सुरू झाला, असे विश्वास यांनी सांगितले. आम्ही शेतकरी ते ग्राहक ही साखळी सांभाळत आलो, अशी माहिती इंद्रनीलने दिली.
पुढच्या पिढीकडे जबाबदारी देताना तिला सक्षम बनवण्याचे काम चितळे कुटुंबातील महिला करीत असल्याचे सांगून अंजली म्हणाल्या, वेळ फुकट घालवायचा नाही, हा संस्कार माझ्यावर सासरी झाला. आमच्याकडे गायी-म्हशींची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची टीम आहे. प्राण्यांचे रक्ततपासणी केंद्र चितळेंनीच सुरू केल्याकडे इंद्रनील यांनी लक्ष वेधले. दिवाळीला घरचे पदार्थ खाता की दुकानातून आणता, हा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला असता, विश्वास म्हणाले, घरचा लाडू-चिवडा चांगलाच, पण चेंज म्हणून दुकानातले पदार्थही आवडतात. गाय हे शेतकऱ्यांसाठी एटीएम आहे. आज चारा दिला की, उद्या दूध देते. साखरेपेक्षा जास्त पैसा हा दुधाच्या व्यवसायातून मिळतो, असे त्यांनी सांगितले.