कोरोना लसीकरणासह आत्मनिर्भर भारत जनजागृतीसाठी जिल्ह्यात फिरणार चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:40+5:302021-02-17T04:47:40+5:30
ठाणो : केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत कोरोना लसीकरणाची माहिती देण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. लसीकरणाचा लाभ संबंधितांनी मोठ्या ...
ठाणो : केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत कोरोना लसीकरणाची माहिती देण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. लसीकरणाचा लाभ संबंधितांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कोटेकोर पालन करावे यासाठी या चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या चित्ररथाला मंगळवारी हिरवा झेंडा दाखवला.
कोरोना लस ही सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रींचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व तालुक्यांत जनजागृतीसाठी बहुमाध्यमी मोबाइल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे व कलापथक मोहिमेचा शुभारंभही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि राज्याचा आरोग्य विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत १६ व्हॅन्सद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, महाराष्ट्र व गोवा विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १० दिवस व्हॅन्सद्वारे फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. आनंद तरंग फाउंडेशन व शाहीर उत्तम गायकर यांच्या वतीने हे लोककला कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.
.........
फोटो आहे -
कॅप्शन - कोरोना लसीकरण व नियमांची जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे आदी.