महिला बचत गट तयार करणार चॉकलेट, लेदर बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:54 AM2019-09-07T00:54:16+5:302019-09-07T00:54:41+5:30
टीडीसी देणार प्रशिक्षण : महिलांच्या प्रगतीसाठी पाऊल
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) १५ हजार ३१० कोटी ढोबळ नफ्यासह तीन हजार २०० कोटीनिव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षात कमावला आहे. अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीशील व विविध पुरस्कार प्राप्त नऊ महिला बचतगटांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक पाठबळाच्या साहायाने त्यांच्या प्रगतीचीदेखील घोडदौड सुरू केली आहे. व्यवसायिक प्रगतीसाठी नामवंत व विविध पुरस्कार प्राप्त डोंबिवलीतील दोन बचत गट, वसईतील सहा आणि ठाणे येथील एक अशा नऊ बचत गटांचे टीडीसीसी बँकेने दायित्व स्वीकारून त्यांच्या व्यवसायिक सक्षमतेसाठी त्यांना प्रशिक्षणाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे.
वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार
ज्वेलरी बनवण्यासह युको चॉकलेट, होम डेकोरेट, कापडी पिशव्या, लेदर बॅग, ब्युटी पार्लर आदी विविध प्रशिक्षण स्वखर्चाने या महिला बचत गटांना प्रायोगिक तत्वावर देऊन त्यांनी उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांची व्यवसायिक प्रगती साधण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत उपक्रम हाती घेऊन प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे सुतोवाच टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.या बचत गटांच्या व्यवसायिक प्रशिक्षणानंतर त्यांच्या कामकाजासह त्यांनी तयार केलेल्या उत्पादकासाठी खास औद्योगिक क्षेत्रासह कॉर्पोरेट कंपन्यांशीदेखील चर्चा करण्याचे नियोजन आहे.
एक लाख तीन ४१५ कोटींचा निधी : बँकेने सततच्या वैधानिक व नाबार्ड तपासणीमध्ये अ वर्ग प्राप्त केला आहे. याशिवाय बँकेचे वसूल भाग भांडवल मार्च अखेर चार हजार ३०३ कोटींचे असून एक लाख तीन हजार ४१५ कोटींचा एकूण निधी बँकेकडे आहे. तर स्वनिधी ९३ हजार ३३० कोटींचा आहे. बँकेकडे सहा लाख ९७ हजार ८१५ कोटींच्या ठेवी आहेत. कर्जवितरण तीन लाख एक हजार ३२७ कोटींचे आहे. खेळते भांडवल आठ लाख ३१ हजार ४३३ कोटींचे असल्याचेही पाटील यांनी लोकमतला सांगितले.