कसदार साहित्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:39 AM2018-04-22T05:39:39+5:302018-04-22T05:39:39+5:30
सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो.
जान्हवी मोर्ये, डोंबिवली|
सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. मोबाइल, इंटरनेटच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावत चाललीय, अशी होणारी ओरड डोंबिवलीतील पै फ्रे ण्ड्स लायब्ररीचा ‘पुस्तक आदानप्रदान’ उपक्रम पाहून खोटी वाटते. या उपक्रमात धार्मिक ग्रंथांबरोबरच ऐतिहासिक, वैचारिक साहित्य, बालसाहित्य, अत्रे, पु.ल, वि.स. खांडेकर, व.पु. काळे अशा दिग्गज साहित्यिकांच्या कादंबºया, क्रीडाविषयक साहित्याचे आदानप्रदान झाले. चांगली पुस्तके घरात पडून राहू नये, उलट ती इतरांना वाचता यावी, हा देणाºयांचा मुख्य उद्देश दिसून आला. दर्जेदार मराठी पुस्तकांवर जुनी आणि तरुण पिढी अक्षरश: तुटून पडली होती.
डोंबिवलीत दुसºया वर्षी राबवलेल्या पुस्तक आदानप्रदान उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. ही संकल्पना लायब्ररीचे प्रमुख पुंडलिक पै यांची. उद्देश एकच, एकाने वाचलेले चांगले पुस्तके दुसºयापर्यंत पोहोचले पाहिजे. ते पोहोचत नाही. तसेच काही जणांना पुस्तके वाचून झाल्यावर संस्थेला देण्याची इच्छा असते. मात्र, ती कुठे व कशी नेऊन द्यावीत, असा प्रश्न असतो. काहींना पुस्तके देऊन वाचनाची भूक भागवण्यासाठी आणखी पुस्तके घ्यायची असतात. डोंबिवलीत भरलेल्या या प्रदर्शनासाठी मुंबई, पनवेल, कर्जत आणि पुण्याहूनही वाचक आले होते. काहींनी पुस्तके दिली. काहींनी पुस्तके चाळली. काही जण आवडलेली पुस्तके घेऊन गेल, तर काहींनी त्याच्या बदल्यात पुस्तके नेली नाहीत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तक आदानप्रदानमध्ये ट्रेण्ड बदलला होता. शैक्षणिक पुस्तके बाजारात मिळत असल्याने फार आली नाहीत. तर, शाळेच्या लायब्ररीतून आणि सरकारकडून पुस्तके पुरवली जातात. मात्र, मराठी भाषेतील सर्वाधिक पुस्तके प्रदर्शनात आली. इंग्रजी व मराठी भाषेच्या तुलनेत अन्य भाषांची पुस्तके कमी प्रमाणात आली. बालसाहित्य म्हटले तर बोक्या सातबंडे, ज्ञानसागरातील शिंपले, फास्टर फेणे, रामायण-महाभारतातील गोष्टींची पुस्तके आली. अर्थात, मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुले आजही ही पुस्तके वाचतात. त्यांना ती आवडतात. अगदी पूर्वीपासून लोकप्रीय असलेला चांदोबासुद्धा त्याठिकाणी होता. त्यामुळे आजच्या पिढीला हॅरी पॉटर आवडत असला तरी विक्रम वेताळ, बोक्या सातबंडेही मुले जरूर वाचतात. त्यात अकबर बिरबलाच्या गोष्टींची पुस्तकेदेखील पाहावयास मिळाली. दुसरीकडे प्रौढ आणि प्रगल्भ साहित्यवर्गात पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, शांता शेळके, शं.ना. नवरे. ह.मो. मराठे, जयवंत दळवी, दातार शास्त्री, मारुती चितमपल्ली यांची पुस्तके होती. ती जितक्या प्रमाणात आली, तितक्याच प्रमाणात ती अनेक जण वाचनासाठी घेऊनही गेलेत. जुन्या लेखकांचे कसदार साहित्य वाचण्यात आजही वाचकांना रस आहे.
ऐतिहासिक पुस्तकात महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा छत्रपती, रणजित देसाई लिखित स्वामी, विश्वास पाटील यांची पानिपत ही पुस्तके आजही वाचक वाचतात आणि अनेकजण वाचनासाठी शोधतात. ही त्या लेखकांच्या लेखनाची ताकद म्हटली पाहिजे.
स्वामी विवेकानंदांची पुस्तकेही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात आली. त्याचे कारण स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीने स्वामींच्या साहित्याचा प्रचार व प्रसार असावा. तर, स्वामींच्या पुस्तके वाचनातून त्यांच्या विचाराचा प्रसार होतो. क्रिकेट न आवडणारा भारतीय विरळाच म्हणावा लागेल. अशा क्रिकेटचे हीरो सुनील गावसकर, कपिलदेव, संदीप पाटील यांच्यावरील लिहिलेली पुस्तकेही प्रदर्शनात खूप आली. त्यामुळे क्रीडा साहित्य, एखाद्या क्रीडापटूचे आत्मचरित्र वाचले जात आहे, हे नक्की. चित्रपट, अनुवादित पुस्तकेही यात होती. एकंदरीतच या प्रदर्शनात मराठी पुस्तके जितकी आली, तितकी ती वाचण्यासाठी जुनी आणि तरुण पिढीही तुटून पडली होती. काही इंग्रजी पुस्तकेही यातून उपलब्ध झाली.
काही पुस्तकांच्या प्रती बºयाच वर्षांनी बाजारात येतात. तर, काही आज बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे अशा पुस्तकांच्या शोधात असलेल्यांनी ती पुस्तके लगोलग उचलली. मागील वर्षी सरसकट पुस्तके प्रदर्शनात आली होती. यंदाच्या वर्षी तसे न होता उलट चांगल्या दर्जाची आणि सर्वसमावेशक स्वरूपाची पुस्तके प्राप्त झाली. मुख्यत: अनेक वाचकांनी पुस्तके दान केली, मात्र त्या बदल्यात पुस्तके नेली नाहीत. त्यामुळे जास्त पुस्तके जमा झालीत. पुस्तके घरात पडून राहू नयेत, हा देणाºयांचा उद्देश होता.
अनेकदा पुस्तके रद्दीत दिली जातात. ती रस्त्यावरील रद्दीच्या दुकानात धूळखात पडतात, अथवा भेळीचा कागद बनतात किंवा कागदी पिशव्या तयार केल्या जातात. हा पुस्तकाचा नव्हे तर तो सरस्वतीचा अवमान आहे. साहित्य, संस्कृती आणि भाषा अशी रद्दीत निघाली,, तर पुढची पिढी रद्दीत निघेल, अशी भीती व्यक्त केली गेली. मग, कपाळावर हात मारण्यापेक्षा सजग समाज घडवण्यासाठी त्याच हातांनी पुस्तकांचे आदानप्रदान महत्त्वाचे आहे.पुस्तकापासून आजची पिढी लांब चालली आहे. तिला या प्रकल्पातून वाचनाकडे वळवता येईल. मोबाइल आणि सोशल मीडियाचा अतिरेक करणाºया तरुणाईला वाचनाची गोडी लावता येईल. त्यांच्या पसंतीची पुस्तकेही त्यांना मिळवून देता येतील, असे पै यांनी सांगितले
कसदार साहित्याचे उदाहरण म्हणजे सात सक्कंम् एकेचाळीस ही कादंबरी किरण नगरकर यांनी लिहिली होती. ती नुकतीच शब्द प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तिच्या प्रती बाजारात आहेत. अशा प्रकारच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध
होऊ शकतात. त्यातून वाचकांची भूक भागवता येईल.