निवड एका बचत गटाची, तर लाभ भलत्यालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:48+5:302021-03-15T04:36:48+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्यांच्या वाटपासाठी व कृषी विभागाने शेतीच्या अवजारे बँक साहित्याचे लाभार्थी म्हणून मुरबाड तालुक्यातील ...
ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्यांच्या वाटपासाठी व कृषी विभागाने शेतीच्या अवजारे बँक साहित्याचे लाभार्थी म्हणून मुरबाड तालुक्यातील आदिवासी कातकरी महिला बचत गटाची निवड केली होती. पण, या बचत गटाऐवजी दुसऱ्याच महिला बचत गटाला या शेळ्यांसह शेती साहित्याचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये माेठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे. याविराेधात साेमवारी मुरबाड पंचायत समितीला घेराव घालून आंदाेलन छेडण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे.
मुरबाड तालुक्यातील मौजे शेलगाव येथील कातकरी महिलांच्या अनिता बचत गटाच्या नावे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान शेळ्यांचा कळप वाटपासाठी सेस योजना २०१९-२० नुसार मंजूर केली हाेती. यानुसार या शेळ्यांचे वाटप झाल्याचे सांगितले जात आहे. या शेळ्या या लाभार्थी महिला बचत गटातील महिलांना अद्याप मिळालेल्या नाहीत, अशी तक्रार बचत गटाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अनिता बचत गटाच्या दहा कातकरी महिलांपैकी एकीलाही त्या मिळालेल्या नसल्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या बचत गटातील सहा महिलांची नावे अन्य शेतकरी बचत गटात दाखवून त्या गटाला कृषी विभागाने सेस फंडातून पाच लाखांच्या कृषी अवजारे बँक साहित्य (हरित यंत्रे) योजनेचा लाभ दिल्याचा आरोप केला केला आहे. प्रत्यक्षात या महिलांना लाभ मिळाला नसल्याने बचत गटाने जिल्हाधिकारी, मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल कृषी विकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे पठविला. तीन महिन्यांनतरही जिल्हा परिषदेने कारवाई केलेली नाही. याबाबत गांभीर्य नसल्यामुळे श्रमिक मुक्तीच्या कार्यकर्त्यांसह महिला बचत गट मुरबाड पंचायत समितीत साेमवारी आंदोलन करणार असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. इंदवी तुळपुळे यांच्यासह दशरथ वाघ, प्रभाकर देशमुख, गणपत मेंगाळ, लक्ष्मण वाघ, गणपत वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
.........
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने मुरबाड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे शेळ्या खरेदीसाठी निधी दिलेला आहे. तेथे शेळ्या खरेदीसह वाटपात घोळ झालेला आहे. त्यानंतर संबंधितांकडून वसूल केलेली रक्कम पं. स. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा आहे. त्यास अनुसरून स्थानिक अधिकाऱ्याने निर्णय घेणे अपेक्षित आहे
- डॉ. लक्ष्मण पवार,
पशुसंवर्धन अधिकारी, जि. प., ठाणे