चॉपर आणि तलवारी बाळगणा-या गुंडाला ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:21 PM2019-09-26T23:21:07+5:302019-09-26T23:26:04+5:30
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी आता विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर व्यापक कारवाई सुरु केली आहे. वागळे इस्टेट किसननगर भागातील एका घरातून चार तलवारी आणि चार चॉपरसह पियूष देवनाथ याला श्रीनगर पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट, किसननगर क्रमांक-३ येथील इंदिरासदन या सोसायटीतील तळमजल्यावरील घरात तलवारी आणि चॉपर ठेवणा-या पीयूष देवनाथ (३६) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून चार चॉपर आणि चार तलवारी अशी शस्त्रसामग्री हस्तगत केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सुजित ऊर्फ चुवा पाठक आणि त्याचा साथीदार पीयूष यांनी किसननगर नं. ३ मधील लव्हली साडी दुकानाच्या समोरील आपल्या घरात तलवारी आणि चॉपर ही शस्त्रसामग्री लपवून ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्याआधारे २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाठक याच्या इंदिरासदन या इमारतीमधील घरातून ही शस्त्रे हस्तगत केली. पाठक आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध सहपोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.