महिला प्रवाशांना नाताळ भेट : आजपासून लोकल सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:15 AM2018-12-26T03:15:39+5:302018-12-26T03:16:29+5:30
बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली.
मीरा रोड : बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली. आमदार प्रताप सरनाईक व शिवसैनिकांंनी भार्इंदर स्थानकात लोकलला भगवा झेंडा दाखवला. मीरा रोड स्थानकात काँग्रेस व शिवसेनेचा गराडा असल्याने महापौर डिम्पल मेहता यांना लोकलजवळ येता आले नाही. या राजकीय श्रेयवादात न पडता प्रवाशांनी लोकल पुन्हा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला.
गेली १२ वर्ष सुरू असलेली सकाळी ९ वाजून सहा मिनीटांची भार्इंदर - चर्चगेट महिला स्पेशल लोकल एक नोव्हेंबरपासून भार्इंदर स्थानकातून बंद करण्यात आली होती. लोकल बंद केल्याने महिला प्रवाशांनी भार्इंदर व मीरा रोड स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. तीन डिसेंबरला खासदार राजन विचारे यांच्यासह महिला प्रवासी, सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांची पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांशी सुमारे तासभर बैठक झाली होती. या बैठकीतच २५ डिसेंबरपासून महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु १९ डिसेंबरला आमदार नरेंद्र मेहता व काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रयत्नामुळे २५ डिसेंबरपासून लोकल पुन्हा होणार असल्याचा दावा केला होता.
पाठोपाठ शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेतली असता त्यात उपस्थित महिला प्रवाशांनी तीन डिसेंबरला खासदारांसह झालेल्या बैठकीतच महिला लोकल २५ पासून सुरू करण्याचा निर्णय झाला होता असे सांगत भाजपा व काँग्रेसच्या दाव्यातील हवाच काढली. खा. राजन विचारे यांनीही तीन डिसेंबरच्या बैठकीच्या बातम्या प्रसिध्दी माध्यमात आल्या होत्या असे सांगत भाजपा व काँग्रेस खोटारडेपणा करत असल्याची टीका केली होती.
सोशल मीडियावरूनही महिला लोकल पुन्हा सुरू करण्याची चढाओढ रंगलेली असताना मंगळवार सकाळपासून शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाईंदर व मीरा रोड स्थानकात गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्याने प्रवासी तुरळकच होते.
भार्इंदर स्थानकात भाजपाकडून पत्रके वाटण्यात आली. तर काँग्रेसचे पदाधिकारी महिला प्रवाशांना पेढे वाटत होती. शिवसैनिकांनीही प्रवाशांना पेढे वाटले. लोकलला भगवे झेंडे लावले होते. तीघांचीही घोषणाबाजी सुरू होती. परंतु शिवसैनिकांनी बाजी मारत मोटरमनकडील भागात ठिय्या मारला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिकांनी लोकल सुटण्याच्यावेळी भगवा झेंडा दाखवला.
सेनेच्या नगरसेविका व महिला शिवसैनिकांनी लोकलमधून प्रवास करत मीरा रोड स्थानक गाठले. लोकल सुटल्यानंतर खा. विचारे आले.
महापौरांना बाजूलाच उभे राहावे लागले
मीरा रोड स्थानकात काँग्रेसच्या नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती.
फलाटावर उपस्थित असलेले व लोकलमधून उतरलेले शिवसैनिक यांचीही गर्दी होती.
त्यामुळे लोकलच्या स्वागतासाठी आलेल्या महापौर डिंपल मेहता, नगरसेविका व कार्यकर्त्यांना एका बाजूलाच उभे रहावे लागले. शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे यायला जागाच दिली नाही.
मीरा रोड स्थानकातही तिन्ही पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
भाईंदरहून सुटणारी महिला विशेष लोकल विरारहून सोडण्यास सुरूवात केल्याने मीरा-भाईंदरच्या प्रवाशांना गाडीत चढणे कठीण झाले होते.
ही लोकल बंद झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला होता. रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांची समस्या मांडली होती.