ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने , साडेचार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:52 AM2017-12-25T00:52:08+5:302017-12-25T00:52:25+5:30
ख्रिस्तीबांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे
ठाणे : ख्रिस्तीबांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातही बंदींनी या सणानिमित्त गोड पदार्थ बनवले आहेत. हे पदार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर नऊ ठिकाणी पाठवण्यात आले असून यातून कारागृहाच्या बेकरी विभागाने चार लाख ७७ हजार ३७४ इतके उत्पन्न मिळवून दिले आहे.
बंदींच्या हातांना काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी काम सुरू असते. बेड, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, बिस्किटे, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. विशेषत: दिवाळी-नाताळनिमित्त या बेकरी विभागात विविध फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या बेकरी विभागात नाताळचे औचित्य साधून कप केक, स्पंज केक, साधे पाव तयार करण्यात आले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ठाणे कारागृहातील १५ बंदी या कामात गुंतले होते. कारागृह आणि संस्थांनी मागणीनुसार त्यात्या ठिकाणी हे पदार्थ पाठवले आहेत. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तळोजा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह (आधारवाडी जेल), ठाणे मध्यवर्ती कारागृह, सेंटर फॉर पीस ट्रस्ट प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, सीड आॅफ होम चॅरिटेबल ट्रस्ट, प्लेवीन संतारिटा प्रिझन मिनिस्ट्री इंडिया- गोरेगाव, संजीवनी फाउंडेशन सामाजिक प्रगती केंद्र, लुईस कम्युनिटी सेंटर - कल्याण येथून या पदार्थांना मागणी आली होती. यात कप केकला मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तर स्पंज केकला भायखळा जिल्हा कारागृह या ठिकाणाहून अधिक मागणी आली. २५,१३६ नग केक कपातून एक लाख ८४ हजार ७५० रुपये, १६ लाख सहा हजार ५०० किलो स्पंज केकमधून दोन लाख ५३ हजार २४ रुपये, तर ९९०० नग साध्या पावांमधून ३९ हजार ६०० रुपये उत्पन्न मिळाले.