पोलिसावर दगडफेक करणाऱ्या गुंडाला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:49 AM2019-06-15T00:49:58+5:302019-06-15T00:50:12+5:30
जमावाने पकडले : पोलिसांनी केली अटक
ठाणे : महागिरी कोळीवाडा येथील रहिवाशांना शिवीगाळ करून गोंधळ घालणाºया मुझम्मील सिकंदर मेमन (२३, रा. महागिरी, ठाणे) या सराईत गुंडाला रोखणारे पोलीस कॉन्स्टेबल वसंत मंडळ (३२) यांच्यावरच दगड भिरकावल्याने संतापलेल्या जमावाच्या एका गटाने त्याला बेदम चोप दिल्याची घटना घडली. जमावानेच त्याला त्याला ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आरोपीला पोलिसांनीअटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंडळ यांची १३ जून रोजी महागिरी कोळीवाडा भागात पेट्रोलिंग सुरु होती. त्याचवेळी महागिरी भागात एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्याठिकाणी सराईत गुन्हेगार मेमन याने आरडाओरडा करुन गोंधळ घातला होता.
काही लोकांवर त्याने दगडही भिरकावले होते. त्याला शांत राहण्याचे मंडळ यांनी आवाहन केले. त्यावेळी त्याने शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्कीही केली. त्यानंतर त्यांच्यावरही त्याने दगड भिरकावला. मंडळ यांनी तातडीने पोलिसांची जादा कुमक बोलविली. त्याच दरम्यान त्याने तंबाखू विक्रेते शब्बीर मेमन यांच्या दुकानात शिरुन त्यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यामुळे संतापलेल्या जमावाने त्याला चांगलीच मारहाण केली. यात त्याच्या तोंडाला, हाताला आणि नाकाला जबर मार लागल्याने तो मारहाणीत जखमी झाला आहे.
जमावानेच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलीस आणि इतर रहिवाशांना धक्काबुक्की करणे आणि दगड मारणे आदी कलमांखाली त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.