आरोग्य कार्यालयाला घेराव
By admin | Published: September 1, 2015 04:25 AM2015-09-01T04:25:30+5:302015-09-01T04:25:30+5:30
पालघर जिल्ह्यातील सर्व संवर्गांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन मिळाले नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलीची फी भरायला तसेच आईच्या
पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व संवर्गांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन मिळाले नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलीची फी भरायला तसेच आईच्या आॅपरेशनसाठी पैसेच नसल्याने तणावाखाली आलेल्या सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला यातील गांभीर्य लक्षात येत नसल्याने सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला.
जिल्ह्यातील पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि तलासरी तालुक्यांतील काही आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांचे मार्च २०१५ पासून तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संवर्गांतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जून २०१५ पासून प्रलंबित असून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची व कर्जबाजारीची वेळ ओढवली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून कुटुंबाचे अर्थचक्रच पूर्ण कोलमडल्याने घरात अनेक क्लेष निर्माण होत असल्याचे कार्याध्यक्ष नूतन पाटील यांनी सांगितले. डहाणू तालुक्यातील सायवन प्रा.आ. केंद्रातील कर्मचारी दादा नथुराम चव्हाण या ४२ वर्षीय कर्मचाऱ्याकडे त्यांच्या मुलीची फी भरण्यासाठी आणि आईच्या आॅपरेशनसाठी पैसेच उपलब्ध नसल्याने घरात वादावादी सुरू होती. या तणावाखाली २८ आॅगस्ट रोजी सायवन रुग्णालयात कामावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे अध्यक्ष बी.एम. सातपुते यांनी पत्रकारांना सांगितले. (वार्ताहर)