ऑनलाइन गणेश दर्शनाबाबत मंडळांची अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:48+5:302021-09-13T04:39:48+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी गणेशोत्सवात चलचित्र आणि देखावेदेखील तयार करीत असतात. मात्र गेल्या ...
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी गणेशोत्सवात चलचित्र आणि देखावेदेखील तयार करीत असतात. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे साधी सजावट करून गणेशोत्सव साजरा करत आहेत. भाविकदेखील कमी प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज भासत नाही. कोणीही या दर्शन घेऊन जा, अशी परिस्थिती अंबरनाथमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची झाली आहे.
अंबरनाथमध्ये दरवर्षीप्रमाणे हवी तशी धामधूम गणेशोत्सवात दिसत नाही. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनीदेखील कमी खर्चात सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे सजावट पाहण्यासाठी आणि गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी कमी होती. पोलिसांनी आणि पालिका प्रशासन यांनी सार्वजनिक मंडळांना ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात भाविकांची गर्दी कमी असल्याने कोणत्याही मंडळाने ऑनलाइन दर्शनासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे भाविकही मंडपात जाऊन दर्शन घेत आहेत.
हीच परिस्थिती बदलापूरमध्ये निर्माण झाली असून अनेक मंडळांनी भाविकांसाठी मंडप सुरू ठेवले आहेत. मात्र त्या ठिकाणी गर्दी होत नसल्याने ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे.