"उल्हासनगरातील धोकादायक इमारत पुनर्बांधणीचे परिपत्रक तयार, दिवाळीत मिळणार गोड बातमी"
By सदानंद नाईक | Published: October 22, 2022 06:03 PM2022-10-22T18:03:04+5:302022-10-22T18:04:13+5:30
उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे.
उल्हासनगर - शहरातील अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीची पुनर्बांधणीचे शासन परिपत्रक तयार असून ऐन दिवाळीत शहरवासीयांना गोड बातमी मिळणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील समस्या बाबत चर्चा केली.
उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत शासन एका समिती स्थापन केली. समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अहवाल दिला असून अहवालाची तपासणी एका समिती कडून होत आहे. पावसाळी अधिवेशनात धोकादायक इमारती बाबत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. दिवाळीत परिपत्रक येणार म्हणून नागरिकांचे लक्ष लागले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो जणांना परिपत्रकामुळे दिलासा मिळणार आहे.
आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी परिपत्रक तयार असून उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रसिद्ध (जी आर) करणार आहे असे आश्वासन दिल्याची माहिती आयलानी यांनी दिली. ऐन दिवाळीत शहरवासीयांना गोड बातमी मिळणार असल्याचे आयलानी म्हणाले. त्याच बरोबर अवैध बांधकाने नियमित करण्याची प्रक्रियाही सुरू होणार असल्याची माहिती आयलानी यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्याचा एमएमआरडीए अंतर्गत पुनर्बांधणी करण्याची मागणी करून रस्त्याची यादी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आमदार यांनी दिली. १० ते १२ रस्त्याच्या विकासाला एमएमआरडीए अंतर्गत निधी मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यामुळे येत्या काही महिन्यात शहरात विकास कामाला गती येणार असल्याचे आयलानी यांचे म्हणणे आहे.
दिवाळीत गोड बातमी मिळू दे
शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येऊन हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आमदार कुमार आयलानी यांच्या मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीला यश येऊन, दिवाळीत नागरिकांना परिपत्रक प्रसिद्ध केल्याची गोड बातमी मिळू दे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते भारत गंगोत्री यांनी दिली.