पावसाच्या ‘पहिल्या लाटे’ने शहरे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:00+5:302021-06-10T04:27:00+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना मंगळवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने धुवून काढले. पहिल्याच पावसाने नालेसफाईचे पोकळ दावे ...

Cities locked down by 'first wave' of rain | पावसाच्या ‘पहिल्या लाटे’ने शहरे लॉकडाऊन

पावसाच्या ‘पहिल्या लाटे’ने शहरे लॉकडाऊन

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना मंगळवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने धुवून काढले. पहिल्याच पावसाने नालेसफाईचे पोकळ दावे फोल ठरले. शहरांच्या सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीमुळे कावलेल्या ठाणेकरांना हवेत आलेल्या गारव्याने दिलासा दिला. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, सध्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने लोकल गोंधळाचा फार मोठ्या प्रवासी संख्येला फटका बसला नाही. मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ, आदी शहरांत भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. उल्हासनगरात दुर्घटनेत महिला जखमी झाली.

ठाण्यात ४७ ठिकाणी पाणी साचले होते, तर दिव्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यांवरही पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. ठाणे महापालिका आयुक्तांसह अन्य शहरातील प्रशासनाने नालेसफाईची कामे समाधानकारक झाल्याचा केलेला दावा पहिल्याच पावसाने फोल ठरविला. ठाणे शहरात नऊ तासांत ११७.६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात भूस्खलन आणि संरक्षक भिंती कोसळण्याच्या चार घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सर्वसामान्य प्रवाशांना बंद असल्याने रस्तेमार्गे मुंबई गाठणाऱ्या वाहनांची ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यासह शहराच्या इतर भागातही गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माजिवडा ते कँडबरी मार्गावरील वाहतूककोंडी झाली होती. विटावा सबवे येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर रोडवर मेट्रोची कामे सुरू असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह मुंबई ठाणे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मंगळवारी रात्रीपासूनच विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासून विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. दुपारी १.२० वाजता खाडीत ३.८३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिकेच्यावतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने यावे‌ळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. पावसामुळे पनवेल- कळवा रोड, रेहमानिया सर्कल येथे, तर मुंब्रा बायपास या दोन ठिकाणी भूस्खलन झाले. ठाण्यातील सावरकर नगर पंचामृत सोसायटी येथे संरक्षक भिंत कोसळली. मनोरमा नगर स्वामी समर्थ फेज-एक येथेदेखील संरक्षक भिंत तीन ते चारचाकी वाहनांवर कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. गटाराचे नियोजन नसल्याने दिवा शहरात अनेक घरांत गटाराचे आणि नाल्यांचे पाणी शिरून दुर्गंधी पसरली होती. दिवा शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत; मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांचे नियोजन नसल्याने बैठ्या चाळीत सांडपाणी शिरले. दिवा-आगासन रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. दिव्यातील नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केली. सहा ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चार ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याचे आढळले.

............

पाणी साचले ४७ ठिकाणी

ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. मात्र, तो फोल ठरला. कोपरी येथील टीएमटी बस स्थानक परिसर, विठ्ठल मंदिल खारेगाव, कोपरी पोलीस ठाणे आनंद नगर, राम मारुती रोड, मांसुदा तलाव परिसर, गडकरी रंगायतन, ऊर्जिता हॉटेल कोर्ट नाका, इंदिरा नगर, काजूवाडी, म्हाडा कॉलनी सावरकर नगर, वर्तकनगर, गावदेवी मंदिर कळवा, महागिरी कोळीवाडा, आदी ४७ ठिकाणी पाणी साचले. पालिकेने संभाव्य पाणी साचण्याची १४ ठिकाणे असल्याचे जाहीर केले होते.

............

वाचली

Web Title: Cities locked down by 'first wave' of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.