तलावांचे नव्हे, ठाणे झाले खड्ड्यांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:32 AM2018-07-30T04:32:45+5:302018-07-30T04:32:59+5:30

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी ठाणेकरांना सतावणारा एकच प्रश्न असतो, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते.

 Cities of potholes, not of ponds, potholes | तलावांचे नव्हे, ठाणे झाले खड्ड्यांचे शहर

तलावांचे नव्हे, ठाणे झाले खड्ड्यांचे शहर

Next
<p>- अजित मांडके, ठाणे

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी ठाणेकरांना सतावणारा एकच प्रश्न असतो, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते. परंतु दरवर्षी खड्डे पडण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. रस्त्यांना वारंवार खड्डे पडू नयेत म्हणून पालिका नवनवे प्रयोग करत आहे. परंतु याच प्रयोगांवर मागील काही वर्षात ७०० कोटींहून अधिक रुपयांची निव्वळ उधळपट्टीच झाली आहे.
कॉंक्रीटच्या रस्त्यांपेक्षा पालिका किंवा लोकप्रतिनिधी किंवा कंत्राटदार असो डांबरी रस्त्यांनाच प्राधान्य देण्याचे काम करतात. कारण याच डांबरातून त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजेच अधिकचा फायदा होत असतो. त्यामुळे याच साखळीमुळे ठाण्यातील रस्ते दरवर्षी खड्यात जातात हे नव्याने सांगायला नको. यंदाही रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु सलग झालेल्या पावसाने पालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले आहेत. परंतु हे खड्डे बुजविण्यासाठी दोन दिवसात दोन प्रयोगही झाले. त्यातील एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. आता दुसरी जी पध्दत वापरण्यात आली आहे, तीच इतर सर्व महापालिकांनी वापरावी असे फर्मानच काढण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात कदाचित हाच कंत्राटदार इतर पालिकाक्षेत्रातील खड्डे बुजवितांना दिसणार आहे.
शहरात आजच्याघडीला ३५६ किलोमीटरचे रस्ते असून त्यातील १०८ किलोमीटरचे रस्ते हे कॉंक्रीट आणि युटीडब्ल्यूटी पध्दतीने करण्यात आले आहेत. तर उर्वरित २४८ किलोमीटरचे रस्ते हे आजही डांबरी आहेत. परंतु याच डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला काही वेळेस पाऊस थांबण्याची वाट बघावी लागत होती. तर काहीवेळेस तात्पुरत्या स्वरुपात पेव्हर ब्लॉक लावणे, खडी टाकणे असे प्रकार सुरु असतात. परंतु यामुळे त्या ठिकाणी पुन्हा खड्डा पडला जात होता. त्यामुळे या सर्वांवर रामबाण उपाय करण्यासाठी पालिकेने दोन वर्षापूर्वी जेट पॅचर मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हाही फेल ठरला. ठाणेकरांना आता जणू या खड्यांची सवयच झाली आहे, त्यामुळे तेही निमूटपणे या खड्यांतून मार्ग काढतांना दिसतात. परंतु या खड्यांमागे अर्थकारण आणि राजकारण लपलेले असते हे कदाचित सर्वसामान्यांना माहिती नसावे, परंतु हेच वास्तव ‘रिपोर्टर आॅन दि स्पॉट’च्या निमित्ताने ठाणेकरांच्या नजरेसमोर ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली. या रस्त्यांवरुन चालणेही दुरापास्त झाले आहे. त्यातही यामध्ये नव्याने बांधलेल्या रस्त्यांचाही समावेश आहे. केवळ पाऊस जास्तीचा झाल्यानेच या रस्त्यांना खड्डे पडल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे हे खड्डे पुन्हा उखडू नयेत म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. महापालिकेने मुंब्रा भागात अ‍ॅक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजविले होते. तर कोपरी पूल येथे रेनकॉनच्या सहकार्याने आणि कॅसल मील परिसरात पॉलिमर सिरॅमिक काँक्रीटने खड्डे बुजविले होते. त्यापाठोपाठ कापूरबावडी उड्डाणपुलावर पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात आले. एकाच आठवड्याच्या अवधीत पालिकेने असे विविध प्रयोग खड्डे बुजविण्यासाठी केले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी पालिका दरवर्षी दोन कोटींची तरतूद करीत असते. मागीलवर्षी तर या दोन कोटी व्यतीरिक्त प्रत्येक प्रभाग समितीसाठी २५ लाखांची तरतूद केली होती. त्यातील किती खर्च झाला, किती शिल्लक याची माहिती मात्र पालिकेच्या दप्तरी नाही. दरवर्षी अशा पध्दतीने खड्डे पडत असल्याने कंत्राटदारांची मात्र चांदी होते. केवळ कंत्राटदारांचेच खिसे गरम होत नाहीत, तर यामध्ये काही प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पेव्हरब्लॉकचा
वापर केव्हाच बंद
वास्तविक पेव्हरब्लॉक हे केव्हाच बंद झाले आहेत. असे असतानाही पुन्हा कुणाच्या फेव्हरसाठी हे पेव्हरब्लॉक टाकले जातात हेही न उलगडणारे कोडेच आहे. माजिवडा, कॅसलमील, घोडबंदर, वागळे, लोकमान्य नगर, किंबहुना कापूरबावडी उड्डाणपुलांवरही पेव्हर ब्लॉक वापरले जातात. परंतु यावरुन वाहने गेल्यास ते पेव्हर ब्लॉक पुन्हा बाहेर पडून छोटे असणारे खड्डे मोठे होतात.

साहित्य तपासणी अहवाल गायब
नामांकित कंत्राटदारांना ही कामे दिली तर रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, असा देखील सूर आता लावला जात आहे. रस्त्याच्या साहित्याचे लॅब टेस्टींग केले जाते. परंतु त्याचा अहवाल हा कागदोपत्रीच ठेवला जातो. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात रस्ते बांधणीचे काही निकष तयार करून त्यानुसार रस्त्यांची बांधणी केली जाईल असा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. परंतु आता तो अहवाल कुठे गायब झाला याचा कुणालाच पत्ता नाही.

आय.आर.सी. निकष धाब्यावर
डांबरी रस्ता तयार करताना ज्या ब्लॅक बसल्ट स्टोनचा वापर होणे आवश्यक आहे. तो वापर ठाण्यात कुठेही होत नसल्याचेही या कंत्राटदारांनी मान्य केले आहे. शिवाय काही कंत्राटदार तर खोदलेल्या रस्त्यांची खडी उचलून ती मिक्स करुन पुन्हा नव्या ठिकाणी वापरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यातही ठाण्यात कुठेही आय. आर. सी. निकषानुसार रस्त्यांची बांधणी होताना दिसत नाही.
म्हणजे रस्ता तयार करताना उतार कसा असावा, पाण्याचा निचरा कसा होईल याबाबतची कोणतीही काळजी घेतली जात नाही. रस्त्यांची बांधणी करताना प्रत्येक लेअर योग्य पध्दतीने टाकली जात आहे किंवा नाही, यासाठी चित्रीकरण होणे अपेक्षित आहे. पालिकेकडून जे काही थर्ड पार्टी आॅडिट केले जाते, तेही चुकीच्या पध्दतीने केले जात असून वास्तविक ते आयआटीकडून होणे अपेक्षित आहे. तसेच शहरातील रस्ते तयार करताना त्याचत्याच गल्लीतील कंत्राटदारांना ही कामे वर्षानुवर्षे दिली जातात.

होडीतून प्रवास केल्याचा भास
घोडबंदर भागातील दोन्ही बाजूचे सेवा रस्त्यांची कामे आताच कुठे झाली होती. परंतु दोन्ही बाजूचे रस्ते अक्षरश: उखडल्याचे चित्र आहे. कोलशेत, बाळकूम, वागळे, इंदिरानगर, सावरकरनगर, तीनहात नाका, नितीन कंपनी आदींसह शहरातील दिवा या गावात तर प्रवास करताना एखाद्या होडीतून प्रवास केल्याचा भास होतो. रस्ते मजबूत असतील तर रस्त्यांना खड्डे पडूच शकत नाहीत, असे तत्रंज्ञ मंडळींचा दावा आहे. परदेशात सुध्दा डांबरी रस्ते आहेत, तेथे देखील पाऊस पडतोच की, परंतु तेथील रस्ते काही खराब होत नाहीत, परंतु मग आपल्या देशातील रस्त्यांचे आयुर्मान लगेच कसे संपुष्टात येते.

डांबरी रस्त्याच्या दर्जालाच हरताळ
डांबरी रस्ते तयार करताना त्याचा दर्जा महत्वाचा मानला जातो. परंतु येथे दर्जालाच हरताळ फासण्याचे काम महापालिकेत केले जात आहे. डांबरीकरण करताना सुरूवातीला जमीन साफ करुन घेणे अभिप्रेत असते. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडून त्यावर रोलर फिरविणे आवश्यक असते. जमीन कडक झाल्यावर त्यावर मोठे दगड टाकून नंतर कपची आणि चार नंबरचा ब्लॅक बसल्ट स्टोन (काळा दगड) वापरणे आवश्यक असते. त्यावर पुन्हा व्हाईट स्ट्रेन्थ टाकून त्यावर चार इंचाची डांबराची लेअर टाकावी लागते.
त्यावर पुन्हा तीन नंबरची ब्लॅक बसल्ट स्टोन टाकली जाते. त्यानंतर जीएसबी म्हणजेच व्हॅट मिक्स डांबर आणि एक नंबरची बारीक खडी मिक्स करुन त्याचा लेअर टाकला जातोे. त्यावर डीएम डांबर टाकून तीन तीन इंचाची लेअर किंवा सिलीकॉन डांबरचा लेअर चाक इंचाची असावी अशा पध्दतीने हे काम केले जाते. परंतु शेवटची लेअर टाकतांना उन्हाळ्यात साधारण आठ दिवसांचा अवधी द्यावा लागतो. तर काही वेळेस १५ दिवसांचासुध्दा अवधी देणे अपेक्षित असते. परंतु ठाण्यात मात्र संपूर्ण रस्ताच एका आठवड्यात तयार करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत.

‘करून दाखवले’ म्हणणाºयांनी काय केले?
दिवसेंदिवस ठाणे वाढत आहे. शहराचा विस्तार होत असल्याने चांगल्या सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. पण पालिकेला साधे रस्तेही चांगल्या दर्जाचे देता येत नसल्याने ठाणेकरांमध्ये संताप आहे. स्मार्ट सिटी सोडा आधी रस्ते स्मार्ट करा, असा सूर उमटू लागला आहे. करून दाखवले म्हणणाºयांची सत्ता अनेक वर्षे पालिकेत आहे. मग नेमके काय करून दाखवले असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Cities of potholes, not of ponds, potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.