सिडकोच्या धर्तीवर निवासी भाग फ्री होल्ड करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:05 AM2019-01-13T00:05:30+5:302019-01-13T00:05:38+5:30

डोंबिवली वेल्फेअर : मुख्यमंत्र्यांना निवेदन

Citizen area free hold like cidco | सिडकोच्या धर्तीवर निवासी भाग फ्री होल्ड करा!

सिडकोच्या धर्तीवर निवासी भाग फ्री होल्ड करा!

Next

डोंबिवली : डोंबिवली निवासी भाग हा ‘सिडको’च्या धर्तीवर फ्री होल्ड करण्याची मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हा भाग फ्री होल्ड केल्यावर नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच त्यातून सरकारला उत्पन्नही मिळेल, असा मुद्दा असोसिएशनने उपस्थित केला आहे.


असोसिएशनचे पदाधिकारी राजू नलावडे, धर्मराज शिंदे, भालचंद्र म्हात्रे, वर्षा महाडिक, प्रमिला कदम, उल्हास सावंत आदींनी यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांप्रमाणे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही दिले आहे.
डोंबिवली निवासी भाग हा कर्मचारीवर्गासाठी विकसित केला होता. अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. काही कर्मचारी घरे विकून निघून गेले आहेत. या भागात ४०० सोसायट्या व ३०० बंगले आहेत. या भागातील इमारती जुन्या झाल्या आहेत. तसेच काहींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदनिका व भूखंड हस्तांतरण करण्यास अडचणी येतात. सदनिका विक्रीसाठीही जाचक अटी आहेत. त्यातून या जाचातून मुक्तता करण्यासाठी सरकारने ‘सिडको’च्या धर्तीवर निवासी भाग फ्री होल्ड करावा, अशी मागणी केली आहे. हा भाग फ्री होल्ड केल्यावर एमआयडीसीचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच नागरिकांची जाचक अटीतून सुटका होईल. त्याचबरोबर एमआयडीसीला एकरकमी शुल्क मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यापूर्वी सरकारने यासंदर्भातील निर्णय घ्यावा. नागरिकांना दिलासा द्यावा, याकडे असोसिएशनचे लक्ष वेधले आहे.


निवासी भागातील जमिनी या भाडेपट्ट्याने असल्याने त्यांच्या हस्तांतरणात अडचणी निर्माण होतात. फ्री होल्डचा निर्णय घेतला तर भाडेपट्ट्याने असलेल्या जमिनींना मालकी हक्काचे स्वरूप प्राप्त होईल. मालकी हक्काच्या जमिनींच्या हस्तांतरणात कोणत्याही अडचणी येत नाहीत.

Web Title: Citizen area free hold like cidco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको