पर्यावरणसंवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:37 AM2019-06-06T00:37:09+5:302019-06-06T00:37:14+5:30
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल : पर्यावरण दिनानिमित्त केली तीन हजार रोपांची लागवड
ठाणे : पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच खारफुटीची लागवड, वृक्षांचे पुनर्रोपण, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रि या करणे आदी उपक्रम ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. शहर स्वच्छ ठेवणे, ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून ती माझी स्वत:चीदेखील जबाबदारी आहे, असा विचार जेव्हा नागरिक करतील, तेव्हाच खºया अर्थाने ठाणे शहर हे पर्यावरणाभिमुख होईल. महापालिका प्रशासन हे शहराचे एक चाक असून दुसरे चाक नागरिक आहे. त्यांनी महापालिकेस सहकार्य केले, तर भविष्यात पर्यावरण दिन खºया अर्थाने साजरा होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जागतिक पर्यावरणदिनी व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे करण्यात आले होते. या कार्यक्र मास स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका स्नेहा आंब्रे, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, वर्षा दीक्षित, नगरअभियंता रवींद्र खडताळे यांच्यासह विविध संघटनांचे तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना विकासकामांत अडथळा ठरत असलेली झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण केले जात आहे तसेच विकासकाने एक झाड तोडल्यास त्या बदल्यात त्याच्याकडून १५ झाडे लावून घेतली जात आहे. आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ११ लाख झाडे लावण्यात आली आहेत. महापालिका घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करत आहे. येत्या दोन वर्षांत कचºयावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून कचरा समस्या सोडवणारे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदूषण विभागाच्या वतीने हरितवाटिका उभारणी, प्लास्टिक व थर्माकोल या वस्तूंना पर्यायी वस्तूंबाबत माहिती देणाºया अॅपचे, महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन कापडी पिशव्या तयार करणे, पाण्याची गुणवत्ता राखणाºया मशीनची उभारणी, शाश्वत ध्येयप्रणाली राबवणे, स्मार्ट वॉटर मीटर अॅप आदींचे उद्घाटन स्थायी समिती सभापती राम रेपाळे व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पातलीपाडा येथील हिरानंदानी इस्टेट, लेक परिसर येथे तीन हजार विविध जातींच्या रोपांचे वृक्षारोपण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.