अंबरनाथमध्ये नागरिक रस्त्यावर, आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:02 AM2018-11-08T03:02:00+5:302018-11-08T03:02:15+5:30
मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अंबरनाथ - मोरीवली येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने शहरातील कंपन्या आणि त्यापासून निर्माण होणारा प्रदूषणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण करणारा आणि शहरासाठी घातक ठरणाऱ्या कंपनींच्या विरोधात बुधवारी मानवी साखळी तयार करून प्रदूषणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत हे आंदोलन झाल्याने प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष व त्यांचे नेते ‘दिवाळी पहाट’ सारखे कार्यक्र म करण्यात व्यस्त असताना अंबरनाथ शहरातील नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. डम्पिंग, केमिकल कंपन्यातील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बी केबिन रोड ते नवरेनगरपर्यंत मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध केला. अंबरनाथमध्ये सध्या डम्पिंग आणि एमआयडीसीतील कंपन्यातील घातक आणि दुर्गंधी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या समस्येकडे संबंधित यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.
डम्पिंगप्रमाणे नागरिकांचा संतापही धगधगत असल्याने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंग आणि कंपन्यांमधून निघणा-या धुरामुळे ग्रीन सीटी, निसर्ग ग्रीन, नवरेनगर, रॉयल पार्कया भागात राहणाºया लाखो नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. धुरामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
मानवी साखळी
बी केबिन रस्त्यावर सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर एवढी लांब मानवी साखळी तयार केली होती.
प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.