मीरा भाईंदर महापालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात नागरिकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:13 PM2020-07-08T19:13:37+5:302020-07-08T19:14:56+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले.
लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ आणि गैरकारभाराची लक्तरे खुद्द कोविड केअर व अलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकां कडुनच नियमीतपणो वेशीवर टांगली जात आहेत. निकृष्ट जेवण व नाश्ता आणि तो देखील वेळेवर न मिळणो, पिण्यास व आंघोळीस गरम पाणी नाही, साफसफाई नाही यातुनच लहानु मुलांचे व वृध्दांचे होणारे अतोनात हाल यावरुन लोकं संतप्त होऊन खाली उतरुन हल्लाबोल करत आहेत. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला घरी सोडा, वाटल्यास घरा बाहेर टाळे मारुन आम्हाला आत ठेवा चालेल असा उद्वेग लोकांचा चालला आहे. त्यामुळे एरव्ही करदात्या जनतेची उधळपट्टी करणारे नगरसेवक, राजकारणी आणि अधिकारी जनतेच्या तोंडाला मात्र पाने पुसत असल्याचे निषेध व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील कोरोनाचा संसर्ग पाहता भाईंदरच्या क्रिडा संकुला जवळील इमारतीं मध्ये अलगीकरण केंद्र सुरु केले होते. रुग्णांची वाढती संख्या पाहुन लक्षणं नसलेल्यांसाठी रामदेव पार्क जवळील इमारतीत कोविड केअर सुरु करण्यात आले. अलगीकरण केंद्रात कोरोना नसलेले पण संशयीत तर कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांना पालिका ठेवत आहे. महापालिकेने सदर दोन्ही ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना नाश्ता, चहा व जेवण पुरवण्यासाठी ठेकेदार नेमला आहे.
परंतु सदर जेवणा बाबत मोठय़ा संख्येने लोकांच्या तक्रारी असुन कच्च्या चपात्या, बेचव जेवण, कधी आंबुस तर कधी भातात अळ्या वा केस सापडणे या सारख्या लोकांच्या तक्रारी आहेत. नाश्ता बद्दल देखील तक्रारी असुन जेवण - नाश्ता वेळेत मिळत नाही जेणे करुन अन्य आजाराची औषधे घेणारे वा ज्येष्ठांचे हाल होत आहेत. लहान मुलं तर सोडा मोठे देखील कसेबसे जेवण जेवतात.
गरम पाणी पिण्यास वेळेवर मिळत नाही. उन्हाळा होता तेव्हा ठिक होते पण पावसाळा सुरु झाल्याने थंड पाण्याने आंघोळ लहानु मुलं - मोठय़ांनी कशी करायची ? असा प्रश्न लोकं करत आहेत. थंडपाण्याने आंघोळ केल्याने ताप, सर्दी आदी आजार होण्याची भिती वाटत आहे. पालिकेने येथे साफसफाईसाठी देखील ठेका दिला असला तरी स्वच्छतेची बोंबच आहे. सफाई नियमीत नसल्याने घाणीत रहावे लागत असुन महिलांनी तर आम्हालाच फिनाईल, झाडु आदी द्या आम्हीच खोली साफ करु असे प्रशासनास सुनावले.
पालिका कोरोना रुग्ण व संशयीतांना अलगीकरणात ठेवण्यासाठी आणते पण निदान चांगले जेवण, नाश्ता , दूध वेळेवर नाही. स्वच्छता सफाई नाही ? मग आम्हाला आणताच कशाला असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. आम्ही घरी राहु , इकडे राहिलो तर आजारी पडुन मरुन जाऊ असे वाटायला लागल्याचे लोकांनी सांगीतले. लोकं नेहमीच खाली उतरुन संताप व्यक्त करत असुन यातुन गोंधळ होऊन सोशल डिस्टंसिंग देखील राहिलेले नाही.
नगरसेवक, राजकारणी व अधिकारी महापालिकेतील स्वता:च्या आलिशान दालनं, खान-पान , कार्यक्रम व पर्यटन दौरायांवर जनतेच्या पैशांतुन उधळपट्टी करतात. त्यासाठी त्यांना जेवण चमचमीत दर्जेदार व सर्व सुविधा पंचतारांकित लागतात पण येथे शहरातील कोरोना ग्रस्त नागरिकांच्या माथी मात्र निकृष्ट आणि गैरसोयीचा डोंगर मारला आहे. टेंडर आणि अवास्तव कामांसाठी पैशांची समिकरणे जुळवले जातात पण नागरिकांच्या वैद्यकिय सुविधेसाठी देखील यांची वाटमारी चालते असा संताप लोकांनी बोलुन दाखवला. नगरसेवक, नेते व अधिकारायांनी देखील पालिकेच्या कोविड केअर आणि अलगीकरण कक्षात राहुन दाखवावे असे आवाहन नागरिकां मधुन केले जात आहे.