भाजपने पालिकेबाहेर रस्त्यावर क्रिकेट खेळून वाहतूक बंद केल्याने नागरिक संतप्त 

By धीरज परब | Published: November 3, 2023 06:40 PM2023-11-03T18:40:26+5:302023-11-03T18:40:40+5:30

सेव्हन स्क्वेअर अकादमी हि भाजपाची माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित आहे

Citizens are angry as BJP blocks traffic by playing cricket outside the municipality | भाजपने पालिकेबाहेर रस्त्यावर क्रिकेट खेळून वाहतूक बंद केल्याने नागरिक संतप्त 

भाजपने पालिकेबाहेर रस्त्यावर क्रिकेट खेळून वाहतूक बंद केल्याने नागरिक संतप्त 

मीरारोड - मीरारोडच्या सेव्हन स्क्वेअर शाळे जवळील महापालिका मैदानाच्या आरक्षणात भारतरत्न लता मंगेशकर संगीत अकादमी बांधू नका , ती अन्यत्र बांधा. मैदाने मोकळी ठेवा अन्यथा रस्त्यांवर क्रिकेट खेळू असा इशारा भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी दिला आहे .तर महापालिका मुख्यालय बाहेर रस्ता अडवून क्रिकेट खेळत वाहतूक ठप्प केली असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली . तर वाहनात नागरिक , विद्यार्थी आदी अडकून पडले. 

शुक्रवारी मेहतांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिके जवळ भाजपाने आंदोलन केले . मैदाने खेळण्यासाठी मोकळी ठेवा त्यात बांधकामे करू नका अशी मागणी यावेळी मेहता आणि आंदोलकांनी केली . भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा , माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे व डिम्पल मेहता , माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी नगरसेवक प्रभात पाटील , अनिता पाटील , दीपिका अरोरा , वीणा भोईर , भगवती शर्मा , गणेश भोईर , अनिल विराणी, वंदना भावसार आदींसह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते . 

यावेळी वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद करून रस्त्यावर क्रिकेट खेळण्यात आले तसेच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.  मेहता व शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजय काटकर यांना भेटून निवेदन दिले व चर्चा केली . मेहतांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात शहरातील ११ मैदाना पैकी केवळ ३ मैदानाचे पूर्ण मोकळी आहेत . त्यातच आता सेव्हन स्क्वेअर अकादमी लगत महापालिकेचे खेळाचे मैदान आरक्षण क्र . २२६ मध्ये लता मंगेशकर संगीत अकादमी बांधण्याचे प्रस्तावित असल्याने मैदान पूर्णपणे उपलब्ध न होता खेळाडू मैदान पासून वंचित राहणार आहेत .  त्यामुळे नागरिक व खेळाडूं मध्ये तीव्र असंतोष पसरला असून संगीत अकादमी अन्यत्र बांधावी अशी मागणी मेहतांनी केली आहे . मेहतांनी विविध मैदानात बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन कलादालन , आगरी भवन , पाण्याच्या टाक्या, मलनिस्सारण केंद्र , विरंगुळा केंद्र , गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल आदी झालेली असून झोपड्या , गाळे सुद्धा असल्याचे पत्रा द्वारे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले .  

आयुक्तांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले असून तसे न झाल्यास शहरातील रस्त्यांवर क्रिकेट खेळू व येत्या सोमवारी मीरारोड रेल्वे स्थानक जवळ क्रिकेट खेळणार असल्याचा इशारा मेहतांनी दिला . दरम्यान मेहता व समर्थकांनी रस्त्यात क्रिकेट खेळत आंदोलन केल्याने मुख्य मार्गाची वाहतूक बंद पडली . यावेळी उपस्थित पोलिसांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली . त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामा निमित्त निघालेले नागरी , वृद्ध महिला आदी वाहनांत अडकून पडले . यावेळी वाहतूक बंद केल्याबद्दल अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. सेव्हन स्क्वेअर अकादमी हि भाजपाची माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित आहे .  त्या लगत आरक्षण क्र . २२६ हे खेळाचे मैदान असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मैदानाच्या काही भागात राज्यातील पहिले संगीत गुरुकुल लता मंगेशकर यांच्या नावाने होणार आहे . त्याचे भूमिपूजन गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. 

 

आता गुरुकुल सदर मैदानात न बांधता अन्यत्र बांधा अशी तक्रार मेहतांनी केल्याने मेहतांचा स्वतःच्या शाळे लगतचे मैदान मोकळे ठेवण्या मागचा हेतू  काय ? असा प्रश्न चर्चेत आला आहे . शिवाय आ . सरनाईकांच्या कामात अडचण आणून त्यांना लक्ष्य केल्याचे सुद्धा मानले जात आहे . 

Web Title: Citizens are angry as BJP blocks traffic by playing cricket outside the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.