मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:07 AM2021-05-12T09:07:02+5:302021-05-12T09:08:12+5:30
कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत.
मीरा रोड : लसींच्या तुटवड्यामुळे मोजकीच लसीकरण केंद्रे सुरू असून, सर्वसामान्य नागरिक ऑनलाइन नंबर लागत नसल्याने हवालदिल झाले आहेत. नंबर लागला तरी त्यातसुद्धा वशिलेबाजी सुरू आहे. काही नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण केंद्रातील कर्मचारी आणि नागरिकसुद्धा त्रासले असून, फ्रंटलाइन वर्करच्या आड बोगस लसीकरण सुरू असल्याचे आरोप वाढले आहेत.
कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत. त्यातही भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी, तर नाझरेथ शाळा आणि हैदरी चौकातील पालिका सभागृहात ४५ वर्षांवरील नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जात आहे.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ ऑनलाइन नोंदणीद्वारे होत असले तरी नोंदणी करताना लसीकरणाची वेळ मिळत नाही. पालिका मात्र ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांची नोंद केवळ सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घेत असल्याने याची माहिती असणारे त्या वेळेतच नोंदणी करून स्वतःचा नंबर लावून घेत असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्राबाहेर उभ्या असणाऱ्या पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षक आणि लसीकरण कर्मचाऱ्यांना न जुमानता पालिकेचे ओळखपत्र दाखवून किंवा नगरसेवकाने सांगितले आहे, पोलीस आहोत असे सांगून लोक आत शिरतात. काही नगरसेवक लसीकरण केंद्रात वावरताना व हस्तक्षेप करतानाही दिसतात. आतमध्येसुद्धा ओळखीचे किंवा वशिला लावून लसीकरण केले जाते. यामुळे वशिला नसलेल्या नागरिकांना बाहेर रांगेत तसेच आत केंद्रातसुद्धा काही तास ताटकळत बसून राहावे लागते.
काही नगरसेवक, राजकारणी, पोलीस आदींचा हस्तक्षेप लसीकरण केंद्रांवर त्रासदायक ठरत आहे. वशिलेबाजी आणि हस्तक्षेपामुळे कर्मचारी वर्ग त्रासला आहे; पण विरोध केला तर कामावर त्रास देतील म्हणून गप्प बसून त्यांना हे प्रकार सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवले. महापालिकेने लसीकरण केंद्रात सीसीटीव्ही लावावेत आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासह हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
याप्रकरणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपल्याकडेसुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी आल्या असून लसीकरण केंद्रात हस्तक्षेप, वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही. शहरातील नागरिकांना त्यांच्या नोंदणी क्रमानुसार लस मिळाली पाहिजे. त्यात भेदभाव, वशिलेबाजी कोणी करू नये. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.
फ्रंटलाइन वर्करच्या आडून लसीकरण
- फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरणासाठी पालिकेने अर्ज नमुना ठेवला असला तरी सर्रास बोगस लोकांना तसे दाखले वा पत्र आदी देऊन फ्रंटलाइन वर्करच्या आड लसीकरण करून दिले जात आहे. फ्रंटलाइन वर्करना ऑनलाइन लसीकरण नोंदीची गरज नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. पालिका अशांना टोकन देऊन लसीकरण करत आहे.
- त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लस घेतलेल्यांची सखोल चौकशी करण्यासह त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी व खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.