ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 23, 2023 04:19 PM2023-11-23T16:19:39+5:302023-11-23T16:21:18+5:30

आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे.

Citizens are now also involved in planning the budget of Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग

ठाणे : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाची आखणी केली आहे.

आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात, आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जात आहे. तसेच, शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. ही प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात, लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचे सहकार्य मिळते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून, प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्याच सोबत, नागरिकांची मतेही जाणून घेण्याचीही गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करीत असल्याचे महापालिका आयुक्त बांगर यांनी सांगितले.

आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला व बाल कल्याण या विभागांसाठी कार्यक्रमाची आखणी करताना त्यात काम करणाऱ्या, अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो. तसेच, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांचे प्रश्न लक्षात घेवून त्यांचे प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होते. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच उपयोगी ठरतात.

म्हणूनच, नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी तीन महिन्यांमध्ये विविध गटांच्या माध्यमातून आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात, डॉक्टर्स, वकील, सीए, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक संघटना आदींच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ठाणे शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात राहणारी मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांच्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशीही हा संवाद होणार आहे. स्वतःच्या क्षेत्रात नेमके काय आवश्यक आहे याची जशी जाण या मंडळींना आहे, तसेच शहरात वावरताना, नागरिक म्हणून त्यांना काही सूचना, उपाय, बदल या चर्चेत सुचविता येतील. शहराच्या जडणघडणीत त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सहभागी होता येईल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या शहराच्या जडणघडणीत आपलेही योगदान असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यात, ठाणेकरांना शहराविषयी असलेल्या अभिमानाची प्रचिती यापूर्वीही आलेली आहे. आता हे शहर मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने नागरिक म्हणून आपली जबाबदारीही वाढली आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, परिवहन सेवा, याबद्दल नागरिक वेळोवेळी मते मांडतात. तक्रारी करतात. तसेच, सुधारणा दिसू लागली की कौतुकही करतात. कचरा टाकण्याची पारंपरिक ठिकाणे आता स्वच्छ राहू लागली आहेत. दिवसातून दोन वेळा रस्त्यांची सफाई होऊ लागली आहे. याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद येतो आहे. या पार्श्वभूमीवर, 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमातून ठोस मुद्दे समोर येऊ शकतील. त्यातून चर्चा होऊन महापालिकेच्या कारभारात नागरिकांचा सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून नागरिकांकडून जे मुद्दे समोर येतील त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाईल. तसेच, काही बाबींची उकल राज्य शासनाच्या माध्यमातून होणे आवश्यक असेल तर तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Citizens are now also involved in planning the budget of Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.