सेना नगरसेवकाच्या हट्टापायी नागरिक वेठीस
By Admin | Published: March 30, 2017 06:25 AM2017-03-30T06:25:01+5:302017-03-30T06:25:01+5:30
अंबरनाथमधील सर्वात महत्त्वाचा असलेल्या फातिमा रस्ता कामासाठी तीन महिन्यांपासून पूर्णत: बंद होता.
अंबरनाथ : अंबरनाथमधील सर्वात महत्त्वाचा असलेल्या फातिमा रस्ता कामासाठी तीन महिन्यांपासून पूर्णत: बंद होता. या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गावरून फिरवण्यात आली. मात्र, मागील आठवड्यात या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. या रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, हा राजकीय हट्ट सत्ताधारी शिवसेनेचा आहे. केवळ उद्घाटनाअभावी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम शिवसेना आणि पालिका प्रशासन करीत आहे.
बहुचर्चित फातिमा रस्ता पुन्हा वादात सापडला आहे. या रस्त्याचे काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्यानंतर आता पुन्हा या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर नव्याने वाद सुरू झाला आहे. कामासाठी हा रस्ता २८ डिसेंबरला वाहतुकीसाठी बंद केला. तीन महिने उलटले तरी रस्ता खुला झालेला नाही. या रस्त्यावरील पुलाच्या कामाला विलंब लागल्याने तो रस्ता होळीपर्यंत सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र, रस्ता आणि पुलाचे काम होऊनही हा रस्ता खुला केला नाही.
मागील आठवड्यात रस्त्याचे काम पूर्ण करून कंत्राटदाराने पुढील जबाबदारी पालिका प्रशासनावर सोपवली. मात्र, पालिका प्रशासन हा रस्ता सुरू करण्यासाठी चालढकल करत आहे. रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते व्हावे, हा हट्ट असल्याने उद्घाटन लांबणीवर पडत आहे. अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही. अंबरनाथमध्ये १०० कोटींवर सीसीरोडचे काम झाले आहे. असे असले तरी एकही रस्ता हा उद्घाटनासाठी बंद ठेवलेला नाही. फातिमा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची रहदारी असते. या रस्त्यावर सात शाळा आहेत. (प्रतिनिधी)
खासदारांचे आदेश धाब्यावर
रस्ता तयार असूनही तो खुला झाला नसल्याची दखल थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. पालकमंत्र्यांना उद्घाटनासाठी आठवडाभर वेळ नसल्याने त्या रस्त्याचे उद्घाटन खासदार यांच्या हस्ते करण्याचा चंग शिवसेनेच्या एका गटाने बांधला होता.
उद्घाटनाअभावी नागरिकांचे हाल होत असल्याचे शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना दिले. रस्ता खुला करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, एका शिवसेना नगरसेवकाने कंत्राटदाराला सांगून या रस्त्यावर खड्डा खोदण्यास सांगितले.
कंत्राटदाराने नव्या रस्त्यावर खड्डा खोदून रस्ता पुन्हा बंद केला. शिवसेना नगरसेवकाच्या या कृतीपुढे आता खुद्द खासदार शिंदे हेही हतबल झाले आहेत. रस्त्याच्या श्रेयासाठी त्याचे उद्घाटन करण्याचा घाट स्थानिक नगरसेविका आणि त्यांचे पुत्र नगरसेवक करत आहेत.
ज्या रस्त्यावरून वाद सुरू आहे, तो मुळात कोणत्याही नगरसेवकाच्या प्रभागातील नाही. तो रस्ता शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याला ३ कोटी ५० लाख रुपये निधी दिला आहे. मात्र, या नगरसेवकाने हा रस्ता आपल्या प्रभागाचा असल्याचे भासवत उद्घाटनाचा हट्ट सुरू केला आहे.
काम पूर्ण झालेले असेल, तर रस्ता खुला होणे गरजेचे आहे. नागरिकांना वेठीस धरून कोणतेच काम करू नये. प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी हा रस्ता त्वरित खुला करणे गरजेचे आहे.
- राजेंद्र वाळेकर, उपनगराध्यक्ष
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा रस्ता लागलीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, रस्ता सुरू करण्यात येणार होता. मात्र, काही लहान कामे शिल्लक राहिल्याने ते पूर्ण करून एका दिवसात सुरू करण्यात येईल.
- गणेश देशमुख, मुख्याधिकारी