भिवंडीतील दुगाड ग्रामपंचायत कार्यालयास नागरिकांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:31+5:302021-09-26T04:43:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या ११ लाख रुपयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या ११ लाख रुपयांच्या निधींवर ग्रामसेविकेने डल्ला मारला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ग्रामसेविकेची चौकशी करून तिला निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दुगाड ग्रामपंचायत कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले.
दुगाड या ग्रामपंचायतीस १४ वित्त आयोगातून सुमारे १४ लाख रुपये उपलब्ध झाले होते. ग्रामसेविका हर्षदा गुळवी यांनी आर्थिक वर्ष २०१९ - २०२० व २०२०-२०२१ या काळात लॉकडाऊनमुळे ग्रामसभा व ग्रामपंचायत मासिक सभा प्रत्यक्ष होत नसल्याचा फायदा घेत तब्बल ११ लाख ४ हजार २२० रुपयांचा निधी कार्यालयीन कागदपत्रात नोंद न करता खर्च केला आहे. ही बाब ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मांजरेकर यांनी उघडकीस आणली आहे. या गैरव्यवहारात ग्रामपंचायतीने दिलेल्या नोंदीनुसार अनेक देयके ही वैयक्तिक नावाने दिली असून, गावातील विहिरींमधील गाळ काढला नसताना देखील त्यावर निधी खर्च केल्याचे नमूद आहे. कोविड काळात गावात आरोग्य सुरक्षाविषयक कोणत्याही उपाययोजना न करता फवारणी, कीटकनाशक फवारणी, कचरा एकत्रित करणारे डबे यावर लाखो रुपये खर्च केल्याची माहिती सदस्य प्रकाश मांजरेकर यांनी दिली आहे.
या आर्थिक गैरव्यवहारामधील एकही देयक धनादेशाद्वारे न देता रोखीने दिले. याबाबत ग्रामस्थांनी भिवंडी पंचायत समिती, जिल्हा परिषद ठाणे प्रशासनाकडे मार्च महिन्यापासून पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली. मात्र, ही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करून भ्रष्टाचाराची चौकशी करीत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे टाळे उघडणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेविकेकडून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र, ग्रामसेविकेकडून कोणताही खुलासा आजपर्यंत पंचायत समिती कार्यालयास प्राप्त झालेला नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे.