दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; उल्हासनगरमध्ये डम्पिंगचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:46 PM2020-02-24T23:46:35+5:302020-02-24T23:46:44+5:30
खोकला, दमा, श्वसनाचा जाणवतोय त्रास
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ येथील राणा कम्पाउंडजवळील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्यामुळे कॅम्प नं. ५ येथील खडी मशीन येथे नवीन डम्पिंग ग्राउंड सुरू झाले आहे. हा रहिवासी परिसर असून कचºयाच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहे. या परिसरात राहणाºया सुमारे ५० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंगाला खाज, खोकला, श्वसनाला त्रास, मळमळ, दमा, क्षयरोग आदी रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती भाजपचे पदाधिकारी राजा गेमनानी यांनी व्यक्त करून रहिवासी भागातील डम्पिंग हटवण्याची मागणी पालिका आणि राज्य शासनाकडे केली आहे. डम्पिंगची ही जागा बदलण्यासाठी नगरसेवक आणि नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. महासभेतही नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष वेधून ही मागणी लावून धरली होती. डम्पिंगला वाढता विरोध बघून महापालिकेने राज्य शासनाकडे पाठपुरावा करून डम्पिंगसाठी शहर परिसरात भूखंड देण्याची मागणी केली होती. सहा महिन्यांपूर्वी उसाटणे येथील एमएमआरडीएच्या जागेतील ३० एकर जागा तत्त्वत: देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, अद्याप हा भूखंड पालिकेच्या ताब्यात मिळालेला
नाही.
कॅम्प नं. ५ येथील खडी मशीन येथील डम्पिंग ग्राउंडही एक-दोन वर्षांत ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याआधीच महापालिकेला डम्पिंगसाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. उसाटणे येथे महापालिकेला तत्त्वत: मंजूर झालेला भूखंड न मिळाल्याने कोंडी झाली आहे.
डम्पिंगच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचा प्रसार होत असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात २४ तास सुरू असलेले आरोग्य केंद्र पालिकेने सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच हाजिमंलग परिसरात असंख्य भूखंड असून त्यापैकी एक डम्पिंगसाठी देण्याची मागणीही होत आहे.
डम्पिंग विरोधात आंदोलन
अनेक आंदोलने झाली; मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. डम्पिंग हटवण्याची मागणी राज्य शासनासह पालिकेकडे लावून धरली असून डम्पिंगविरोधात मोठे अांदोलन उभारण्याचा इशारा भाजपचे शहर महासचिव राजा गेमनानी यांनी दिला आहे. शिवसेनेनेही याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.