चाकूच्या धाकावर सोनसाखळी खेचणाऱ्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:10+5:302021-09-22T04:45:10+5:30
ठाणे : वर्तकनगर येथील कोरस सोसायटीसमोरील रस्त्याने पायी जाणाऱ्या सीमा राव (४६, रा. वर्तकनगर, ठाणे) या महिलेची सोनसाखळी खेचून ...
ठाणे : वर्तकनगर येथील कोरस सोसायटीसमोरील रस्त्याने पायी जाणाऱ्या सीमा राव (४६, रा. वर्तकनगर, ठाणे) या महिलेची सोनसाखळी खेचून पलायन करणाऱ्या दोघांपैकी हिमांशू वर्मा (२१, रा. खारघर, नवी मुंबई) याला नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना नुकतीच घडली. त्याला रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली असून, त्याच्याकडून ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
सीमा या १८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या भावाला सोडण्यासाठी कोरस टॉवरसमोरील रिक्षा स्टॅन्डवर गेल्या होत्या. भावाला सोडून त्या घरी परतत असताना कोरस टॉवरजवळ मोटारसायकलीवरून राहुल कश्यप या साथीदारासह आलेल्या वर्मा याने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे सुमारे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र खेचून पलायनाचा प्रयत्न केला. त्याचवेळी सीमा यांनी आरडाओरड केल्याने काही दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून रंगेहाथ पकडले. त्याचेवळी गस्तीवरील सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढोले आणि उपनिरीक्षक उल्हास सुर्वे यांच्या पथकाने वर्मा याला पकडले. चौकशीअंती त्याच्याकडून हे मंगळसूत्र ताब्यात घेऊन त्याला १९ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून अन्यही जबरी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.