डोंबिवलीतील नागरिक वायू प्रदूषणामुळे हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:17+5:302021-03-07T04:37:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरात दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला पुन्हा रसायनाचा उग्र दर्प येत आहे. यामुळे खंबाळपाडा, ९० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेला पुन्हा रसायनाचा उग्र दर्प येत आहे. यामुळे खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, पेंडसेनगर, सुनीलनगर, नांदिवली, डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. उग्र दर्पामुळे आबालवृद्धांना त्रास झाला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
डोंबिवलीतील प्रदूषणाच्या समस्येबाबत शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पक्षाचे राजेश कदम व काही जण एमआयडीसी परिसरात उग्र दर्प कुठून येत आहे, याचा शोध घेत होते. मात्र, एमआयडीसीत तो संदिग्ध दर्प येत नव्हता. कदाचित रासायनिक टाकाऊ पदार्थाचा, द्रव असलेला टँकर कल्याण दिशेला खाडीत किंवा फेज १ जवळच्या नाल्यात रिता केल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असे कदम म्हणाले.
जर कोणास काही संशयास्पद अथवा दर्प जाणवल्यास जवळच्या शिवसेना शाखेत त्वरित संपर्क साधावा, असे ते म्हणाले. पुढील दोन दिवस शिवसेनेचे एक पथक एमआयडीसी परिसरात प्रदूषण करणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेणार आहे. अशावेळी कोणी आढळल्यास त्याला शिवसेना आपल्या परीने न्याय देईल. तसेच प्रदूषण व इतर बाबींबाबत शहर शाखेतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, डोंबिवली ॲक्शन कमिटी फॉर सिव्हिक ॲण्ड सोशल होप्सतर्फे (दक्ष) सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्याचबरोबर प्रदूषण मंडळाकडे नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले. या उग्र दर्पाची जाहीर चौकशी करण्याची मागणी अनेकांनी केली.
कोट
डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली, २७ गावे येथेही उग्र दर्प येत होता. मागील ३० वर्षांतील सर्वात उग्र दर्प शुक्रवारी जाणवत होता. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही. रात्री अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत उग्र वासाचे प्रदूषण कमी झाली होती. शुक्रवार हा एमआयडीसीमधील साप्ताहिक सुट्टीचा वार आहे. तरीही रासायनिक प्रदूषण कसे पसरले, याचाही तपास यंत्रणेने करावा. शासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
- राजू नलावडे, सचिव, डोंबिवली वेलफेअर असोसिएशन