‘युजर फी’विरोधात नागरिक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:00 AM2019-05-22T00:00:10+5:302019-05-22T00:00:12+5:30
उल्हासनगरमध्ये स्वाक्षरी अभियान : तातडीने रद्द करण्याची मागणी
उल्हासनगर : मालमत्ताकराच्या बिलात युजर फीच्या नावाखाली निवासी बांधकामांना वर्षाकाठी ७५० रुपये, तर वाणिज्य आस्थापनांना ११२५ रुपये अतिरिक्त कर लावण्यात आला असून ही फी तातडीने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
महापालिकेच्या ‘युजर फी’च्या निषेधार्थ सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध भागांत स्वाक्षरी अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. आमदार ज्योती कलानी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व नगरसेवकांनी या फी आकारणीला विरोध केला आहे.
उल्हासनगर पालिकेच्या मालमत्ताकर विभागाकडून नवीन मालमत्ताकर बिलाचे वितरण करण्यात येत आहे. सुरुवातीला पालिका प्रशासनाकडून आलेल्या स्वच्छताकर प्रस्तावाचे सत्ताधारी भाजपकडून स्वागत झाले होते. मात्र, शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी व भारिप यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर, सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता बिलात दाखवलेली युजर फी स्वच्छताकराचेच नवे नाव आहे का व कोणाच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आली, असा प्रश्न केला जात आहे.
दरम्यान, स्थायी समिती व महासभेत युजर फीला मान्यता दिल्यानंतरच ती मालमत्ताकराच्या बिलात समाविष्ट केल्याची माहिती उपायुक्त युवराज भदाणे यांनी दिली. युजर फीपासून पालिकेला वर्षाकाठी १५ ते २० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे भदाणे म्हणाले. पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी स्वाक्षरी अभियानाला पाठिंबा दिला असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सत्ताधारी भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह शिवसेना यांनी मिठाची गुळणी घेतली आहे.