तब्बल दोन वर्षे रस्त्याची कामे सुरू असल्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:09+5:302021-02-11T04:42:09+5:30
डोंबिवली: संथगतीने सुरू असलेली विकासकामे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रस्ता आणि रेल्वे समांतर रस्त्यावर ...
डोंबिवली: संथगतीने सुरू असलेली विकासकामे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रस्ता आणि रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. म्हसोबा चौकातून खंबाळपाड्याच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्यावर गेले दोन वर्षांपासून सुरू असलेली कामे बंद अवस्थेत आहेत. विरूध्द दिशेने सुरू असणारी वाहतूक सद्यस्थितीला अत्यंत छोट्या अरुंद गल्लीतून मार्गस्थ होत असल्याने खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच आता वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे.
केडीएमसी परिक्षेत्रात अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याची कामे करण्यात आली. परंतु, ठाकुर्लीतील ९० फूट रस्ता आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर दोन वर्षांहून अधिक काळ ही कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे चालू आहेत. कामे संथगतीने सुरू असल्याने एका दिशेकडील रस्ता बंद ठेवला होता. याचाच एक भाग असलेल्या कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर मलवाहिनी टाकण्याकरिता गेल्यावर्षी खोदकाम करण्यात आले होते. त्याठिकाणी काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा खोदकाम केले आहे. गेल्यावर्षी खोदलेल्या भागात काही महिन्यांपूर्वी केवळ खडीकरण करण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप डांबर टाकण्यात आले नव्हते. तेथे पुन्हा एकदा खोदकाम सुरू झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. काम मार्गी लागूनही डांबरीकरण झालेले नाही. ९० फूट रस्त्यांवरील म्हसोबा चौक ते खंबाळपाड्याकडे जाणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदण्यात आला होता. आता तिथेही पुन्हा एकदा खोदकाम सुरू केले आहे. म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांची परवड `जैसे थे` राहिली आहे. एक मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने अरूंद गल्लीतून वाहने ये-जा करीत आहेत. दरम्यान, ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू असली तरी त्यावर केडीएमसीचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे वास्तव आहे.
-----------------------------------------
वाहतूक वाढली
नवीन पत्रीपूल सुरू झाल्याने तसेच पोहोच रस्त्याचे काम मार्गी लागल्याने समांतर रस्ता आणि ९० फूट रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. परंतु, खोदकामामुळे खड्डयांसह आता कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
------------------------------------------------------
फोटो आनंद मोरे
...........
वाचली