तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:17+5:302021-04-02T04:42:17+5:30
भाईंदर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मीरा- भाईंदर महापालिका कार्यालयात केवळ तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला ...
भाईंदर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मीरा- भाईंदर महापालिका कार्यालयात केवळ तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. परंतु नगरसेवकांसोबत येणारे तसेच राजकारणी, कंत्राटदार आदींना ही प्रवेश बंदी असणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
मीरा- भाईंदरमध्ये कोरोना संसर्गाचा कहर उफाळून आला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. परंतु अत्यावश्यक कामांसाठी व तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना सरसकट बंदी घातल्याने टीकेची झोड उठली. त्यातूनच आता पालिकेने नागरिकांना तातडीच्या कामासाठी पालिकेत प्रवेश देण्यास मोकळीक दिली आहे. ज्या विभागामध्ये तातडीचे काम आहे त्या विभाग प्रमुखाने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाकडे प्रवेश पासची व्यवस्था करायची आहे असे परिपत्रक उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सर्व विभाग प्रमुखांसह पदाधिकारी आदींना पाठवले आहे.
नागरिकांना तातडीच्या कामाव्यतिरिक्त प्रवेश बंदी करताना पालिकेत नगरसेवक त्यांच्या सोबत अनेकांना घेऊन जातात. काही राजकीय नेते, पदाधिकारीही बेधडक पालिका कार्यालयात ठाण मांडतात. कंत्राटदार तसेच स्वतःची व्यक्तिगत कामे नसताना पालिकेत फिरणारे दलाल प्रवृत्तींना रोखणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.