वाढत्या प्रादुर्भावातही नागरिकांची बेफिकिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:02 AM2020-09-25T00:02:14+5:302020-09-25T00:02:58+5:30
कठोर कारवाईला सुरुवात : दुकानदार-ग्राहकांकडून दंडवसुली सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/जव्हार : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वसई-विरारसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३३ हजारच्या पुढे गेली असून आजवर ६३० जणांनी या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमावले आहेत. तरीही जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांमध्ये बेफिकिरी आढळून येताना दिसत आहे. असंख्य नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे आता प्रशासनाने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.
पालघरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नगरपरिषदेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार आणि ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करीत २ लाख १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्ते व दुकानांमध्ये गर्दी होण्याची दाट शक्यता पाहता कोरोनाचा संसर्ग सर्व शहरभर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात
येत आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, चेहºयावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, दुकानासमोर दरपत्रक न लावणे इत्यादी प्रकरणी कठोर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक नगरपरिषदेने केली आहे. मात्र भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, बँका आदी ठिकाणी येणाºया नागरिकांकडून आदेशाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे.
नगरपरिषदेच्या वतीने पालघर रेल्वे स्थानक ते माहीम रोड, विजया बँक ते वळण नाका, मनोर रोड ते
ढवळे हॉस्पिटल, हुतात्मा स्तंभ ते बिडको रोड, देविशा रोड ते पृथ्वी
चौक, जगदंबा हॉटेल टेंभोडे रोड ते आंबेडकर चौक आणि माही
मनोर हायवे- वीर सावरकर चौक
ते शिवाजी चौकपर्यंत आणि पूर्वेकडील इतरत्र भागासाठी एकूण आठ पथके नगरपरिषदेने तैनात
केली आहेत.
शहरातील दुकानदार व ग्राहकांना लाउडस्पीकरच्या माध्यमातून वारंवार सूचना देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले जात नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.
- उमाकांत पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी तथा
दंडात्मक वसुली पथकप्रमुख