विलगीकरण केंद्रातील नागरीकांचे सुरु आहेत हाल, व्हिडीओ झाला व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:11 PM2020-04-21T17:11:38+5:302020-04-21T17:12:11+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विलगीकरण कक्षात अनेक नागरीकांना ठेवले आहे. मात्र आठवडा उलटूनही येथील नागरीकांची तपासणी केली जात नाही. त्यांना वेळेवर अन्न मिळत नाही. इतर सुविधाही उपलब्ध होत नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ठाणे : ठाण्यात एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळला तर खरबदारीची बाब म्हणून या भागातील इतर रहिवाशांना किंवा त्याच्या कुटुबिंयांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परंतु महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असलेल्या अनेकांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. येथे ठेवण्यात येत असलेल्यांची वेळेवर तपासणी होत नाही, कोरोनाची चाचणीही वेळेत होत नाही, जेवायला देखील वेळेत मिळत नाही, स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याची बाब समोर आल्या आहेत. काहींनी येथील व्हिडीओ तयार करुन येथील सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे, याचा आखो देखा हाल व्हायरल केला आहे.
घोडबंदर भागातील कासारवडवली आणि भार्इंदर पाडा येथे शेकडो नागरीकांना आपल्या कुटुंबासह पालिकेने विलगीकरण कक्षात ठेवले आहे. काही नागरीकांना सोडण्यात आले आहे, तर काही नव्याने दाखल झाले आहेत. परंतु आता येथील नागरीकांचे हाल होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये अनेक रहिवाशी हे विलीगकरण कक्षात असतांनाही बिनधास्तपणे फिरतांना दिसत आहेत. लहान मुले रडत आहेत, तर स्वच्छतेचा बोजवारा कसा उडाला आहे, याचेही चित्र दिसत आहे. त्यातही दुपारी तीन तीन वाजेपर्यंत जेवणही मिळत नसल्याचे ते सांगत आहेत. येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचाही दावा त्यांनी या व्हीडीओच्या माध्यमातून केला आहे. जेवण वेळेत मिळत नसल्याने लहान मुले रडत आहेत.
दरम्यान दुसरीकडे कुटुबांतील एकाला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर त्याच्या घरच्यांना येथील विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. परंतु त्यांनी देखील हीच तक्रार केली आहे. या संदर्भात संबधीतांनी थेट ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले असून आम्ही प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मतदान केले आहे, परंतु आता खरी गरज तुमची आम्हाला ाहे , येथे डांबून ठेवल्याचे चित्र आहे. माझ्या भावाला आणि मला मागील काही दिवसापासून ताप येत आहे. मात्र आमच्या घरात एक रुग्ण सापडल्यानंतर वास्तविक पाहता आमचीही तपासणी केली जाणे अपेक्षित होते. मात्र पाच ते सात दिवस झाले तरी आमची तपासणी केलेली नाही. आमची साधी विचारपुसही केली जात नाही. त्यामुळे आता तुम्हीच आमच्याकडे लक्ष देऊन आमची किमान तपासणी करुन द्यावी, सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी भार्इंदरपाडा येथील विलगीकरण कक्षात असलेल्या एका नागरीकाने केली आहे. एकूणच शेकडोंच्या संख्येने येथे नागरीक आणून ठेवण्यात आले आहेत. परंतु त्यांना सुविधा तर पुरविल्या जात नाहीतच परंतु त्या ठिकाणी खबरदाराची उपायही केले जात नसल्याचेच चित्र दिसून आले आहे.
- या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. येथील नागरीकांचे हाल सुरु असून पालिकेने तत्काळ यागोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक सुहास देसाई यांनी दिली.