नागरिक, व्यापाऱ्यांकडून वर्गणीसाठी बळजबरी करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:55 PM2018-08-27T21:55:18+5:302018-08-27T21:55:27+5:30
गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी मागण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मीरा रोड - गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी मागण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डिजे, डॉल्बी सिस्टमला मनाई करतानाच पारंपरिक वाद्यं आवाजाच्या मर्यादेत वाजवा अशी तंबी दिली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळं तसेच वसाहती, चाळ कमिट्या यांनी वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्तांची नोंदणी व मंजुरी घेणे बंधनकारक आहे. शिवाय वर्गणी गोळा करण्यासाठी कोणा ही नागरीक, व्यापा-यांसोबत जबरदस्ती करू नये, असे आवाहन सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. वर्गणीसाठी बळजबरी केल्याबद्दल तक्रार आल्यास मंडळांच्या पदाधिका-यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
उत्सव साजरा करताना बहुतांश मंडळांकडून धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी वा परवानगी घेतली जात नाही. तसेच नागरिक, व्यापा-यांना अनेक वेळा वर्गणीसाठी दमदाटी व जबरदस्ती केली जाते. या आधी काही प्रकरणात मंडळांच्या पदाधिका-यांवर खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल केला गेला आहे. त्यामुळे मनमानी वर्गणी मागणे मंडळ वा वसाहत-चाळ समित्यांना अडचणीचे ठरणार आहे. मंडळांनी नोंदणी करून व सर्व परवानग्या घेऊनच उत्सव साजरा करावा, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक तृतीयांश जागेतच मंडप उभारावा व ध्वनी प्रदूषणाबद्दलचे नियम पाळावेत, कार्यक्रम व देखाव्याची माहिती आधी पोलिसांना द्यावी, वादग्रस्त विषय टाळावेत, मिरवणुकीत मद्यपान करू नये, डिजे - डॉल्बी व मोठे स्पिकर वापरू नयेत आदी सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.