भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका
By धीरज परब | Published: March 28, 2023 03:34 PM2023-03-28T15:34:22+5:302023-03-28T15:35:40+5:30
पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जुन्या दाटीवाटीच्या रहिवासी भागात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर महापालिकेने नवीन १ हजार मिमी व्यासाची १७ कोटी खर्चून नवीन जलवाहिनी टाकली आहे . १ एप्रिल रोजी त्यातून पाणी पुरवठा सुरु होणार असल्याने येथील नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या तासांचे अंतर कमी होऊन पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे .
भाईंदर पूर्वेस नवघर मार्ग परिसर , गोडदेव , शिर्डी नगर आदी अनेक दाटीवाटीच्या रहिवासी भागात गेल्या अनेक वर्षां पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे . भाईंदर पूर्व भागातील नागरिकांना अन्य भागातील नागरिकां पेक्षा विलंबाने पाणी मिळत होते . शिवाय मिळणारे पाणी अपुरे असल्याने येथे सातत्याने पाणी समस्या भेडसावत होती .
ह्या भागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक सह शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक धनेश पाटील, दिनेश नलावडे , नीलम ढवण , अर्चना कदम , तारा घरत , प्रवीण पाटील , वंदना पाटील , जयंती पाटील स्नेहा पांडे , संध्या पाटील अनंत शिर्के आदींनी स्थानिक नागरिकांसह पालिके कडे पाठपुरावा , आंदोलने चालवली होती .
कारण सदर भागात पालिकेचा पाणी पुरवठा हा ४२ ते ४४ तासांच्या अंतराने होत होता . तर अन्य भागात ३५ ते ३६ तासांनी पाणी दिले जात होते . त्यामुळे महापालिकेकडे नवीन मोठी जलवाहिनी तसेच अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्याची मागणी केली होती .
आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब गांभीर्याने घेत अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे यांना तांत्रिक बाबी तपासून उपायोजना करण्याचे निर्देश दिले होते . पालिकेने हटकेश जंक्शन पासून कनकिया उद्यान आरक्षण क्र . २६९ पर्यंत १३५० एमएम व्यासाची तर तिकडून इंद्रलोक जंक्शन पर्यंत १ हजार मिमी व्यासाची नवीन मोठी जलवाहिनी टाकली असल्याचे वाकोडे यांनी सांगितले.
तर नवीन जलवाहिनीची चाचणी व जलवाहिनी धुण्याचे काम झाले असून १ एप्रिल पासून त्या नव्या जलवाहिनी द्वारे भाईंदर पूर्वेच्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे . सदर जलवाहिनीची १७ कोटींचा खर्च आल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली .
शहरातील नागरिकांना समान पाणी मिळणे आवश्यक होते . मात्र भाईंदर पूर्वेच्या नागरिकांनी अनेक वर्ष पाणी वाटपात अन्याय सहन केला. आता नवीन जलवाहिनी मधून पाणी मिळून नागरिकांना समान पाणी मिळेल व येथील पाणी समस्या दूर होणार असल्याचे आ . सरनाईक म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"