मेट्रो-५ भिवंडी-अंबाडी- विरार मार्गे नेण्यासाठी भिवंडी तालुक्यातील नागरिकांचा हट्ट!
By सुरेश लोखंडे | Published: June 25, 2023 08:33 PM2023-06-25T20:33:20+5:302023-06-25T20:35:35+5:30
...या रहिवाश्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे.
ठाणे : एमएमआरडीएव्दारे ठाणे, भिवंडी, कल्याण मार्गे मेट्रो-५चे जाळे पसरवण्यात येत आहे. या मेट्राेचा विस्तार भिवंडी-अंबाडी- विरार मार्गावर करून या परिसरातील रहिवाश्यांचा विकास करावा, अशी मागणी अंबाडी येथील माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कैलाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील अंबाडी, वज्रेश्वरी, दुगाड परिसरातील रहिवाश्यांनी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याकडे लावून धरली आहे. त्यासाठी या रहिवाश्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे.
भिवंडी तालुका हा एम. एम. आर. डी. ए. कक्षेत समाविष्ट आहे. परंतू अंबाडी - दुगाड- वज्रेश्वरी परिसरातील सुमारे शंभर गावे मुलभुत सोयीसुविधा वंचित आहेत. रस्ते, वाहतूक सुविधेचा अभाव, पाणीपुरवठा, पर्यावरण इत्यादी दुर्लक्षितच आहेत. या दुर्गम, डोंगरी भाग शाश्वत विकासापासून दुर राहिला आहे. त्यास गांभीयार्ने घेऊन मेट्रो - ५ चे काम भिवंडी- अंबाडी-वज्रेश्वरी मार्गे करण्याची मागणी या गांवकर्यांनी केली आहे. त्यामुळे या भागातील दर्जेदार व उच्च शिक्षणापासून वंचित तरूणाई, नोकरदार, शेतमाल उत्पादक हे थेट महानगरांना जोडले जातील. वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली येथे देशभरातून येणाऱ्या भावीक आणि पर्यटकांची सोय होईल. ते पश्चिम व मध्य रेल्वेला जोडले गेल्याने दळणवळणाचे सुलभ व स्वस्त साधन उपलब्ध होईल व विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असे कैलाश जाधव यांनी स्पष्ट केले.
अंबाडी शेजारील वाडा तालुक्यात इंडस्ट्रीयल झोन (एमआयडीसी) असल्याने हजारो कामगार रोज अंबाडी मार्गे, ठाणे मुंबई येथून ये-जा करीत असतात. इंडस्ट्रीजची जड वाहतून याच मार्गावरून धावते. त्यामुळे रस्त्याची कायमच चाळण होऊन अपघात घडत असतात. ट्रफिक जॅम ही नित्याचीच झाली आहे. विद्यार्थ्यांना मुंबई, नवीमुंबई ये-जा करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. याचा गांभीयार्ने विचार करून भिवंडी- अंबाडी-विरार यासाठी या मेट्रो चा विस्तार करण्यासाठी रहिवाशी हट्ट करीत आहे.