वालधुनीच्या संवर्धन फेरीकडे नागरिकांची पाठ
By admin | Published: March 27, 2017 05:52 AM2017-03-27T05:52:16+5:302017-03-27T05:52:16+5:30
वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली रविवारी प्रबोधनफेरी काढली. सकाळी
उल्हासनगर : वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली रविवारी प्रबोधनफेरी काढली. सकाळी साडेसात वाजता उल्हासनगर स्थानकाजवळील वालधुनी नदीपासून फेरीला प्रारंभ झाला. मात्र, याकडे नागरिकांनी चक्क पाठ फिरवली. तसेच नगरसेवकही गैरहजर होते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संस्थेने काढलेल्या फेरीत त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिक भरणा होता.
अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक कारखान्यांसह शहरातील शेकडो जीन्स कारखान्यांतील सांडपाणी नदीत सोडले जाते. हे कमी म्हणून की काय, तिन्ही शहरांतील सांडपाणी प्रक्रियेविना थेट नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी अतिप्रदूषित झाले. मुंबईतील मिठी नदीप्रमाणे वालधुनी नदीच्या विकासासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र यश आलेले नाही. वालधुनीतील पाणी दर पाच मिनिटांनी रंग बदलते. (प्रतिनिधी)
वालधुनी नदी वाचवणारच
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून वालधुनी नदी वाचवण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट संस्थेने पुढाकार घेतला.
वालधुनी नदी वाचवणारच, अशी ठाम भूमिका सिंह यांनी घेतली. प्रबोधनफेरीत चांदीबाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला.
कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेने पाठिंबा दिला होता. नगरसेवक रेखा ठाकूर, पर्यावरणप्रेमी सरिता खेमचंदानी, समाजसेवक ज्योती भठिजा, प्रा. प्रकाश माळी यांनी भाग घेतला.