भिवंडी महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद; १५ दिवसात ११ कोटींचा कर भरणा
By नितीन पंडित | Published: December 27, 2023 04:03 PM2023-12-27T16:03:25+5:302023-12-27T16:05:22+5:30
महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी १५ दिवस राबवलेल्या व्याज दरात सुट देणाऱ्या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
नितीन पंडित,भिवंडी: महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी १५ दिवस राबवलेल्या व्याज दरात सुट देणाऱ्या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या पंधरा दिवसांच्या कालावधीत ११ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुली झाली आहे.यामध्ये ८ कोटी रोख रक्कम व ३ कोटी रुपयांच्या धनादेशांचा समावेश आहे.अभय योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महापालिका प्रशासनाकडून अभय योजनेची मुदत आठ दिवसांनी वाढवण्यात आली असून आता ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
भिवंडी महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी रक्कम ६२५ कोटी रुपयांची आहे.आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी सर्व अधिकारी,विभाग प्रमुख,कर्मचारी,भूभाग लिपिक यांना सक्त आदेश दिले होते .त्याची परिणीती होऊन पालिकेच्या कर्मचार्यांनी घेतलेल्या परिश्रमांना यश मिळाले आहे. महापालिका आर्थिक वसुली कमी असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे.त्यामुळे आयुक्त अजय वैद्य यांनी महसूल वसुलीसाठी अभय योजना सुरू केली.पालिका प्रशासनाने यापूर्वी १६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत १५ दिवसांसाठी अभय योजना जाहीर केली होती.त्यावेळी १२ कोटी ४८ लाख ७१ हजार १५८ रुपये थकबाकी व चालू आर्थिक वर्षातील ३ कोटी ९२ लाख ४९ हजार ४२६ रुपये जमा झाले होते.अशा प्रकारे एकूण १६ कोटी ४१ लाख ३९ हजार १८४ रुपयांचा कर जमा झाला आहे.त्यानंतर अभय योजनेचे यश पाहून महापालिका आयुक्तांनी पुन्हा ९ ते २३ डिसेंबर या १५ दिवसांसाठी अभय योजना सुरू केली.या कालावधीत ११ कोटी रुपये जमा करण्यात आले.
भिवंडीत यंत्रमाग व्यवसायातील पगाराची तारीख २५ असल्याने या योजनेचा फायदा घेण्यास अनेकांनी प्रतिसाद देत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली असता आयुक्तांनी ही योजना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती कर निर्धारण अधिकारी सुदाम जाधव यांनी दिली आहे.चालू आर्थिक वर्षात आता पर्यंत ४६ कोटी मालमत्ता कर वसुली केली असून ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत एक कोटी रुपयांनी अधिक असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे.